सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 85 ☆
☆ सत्यमेव ☆
तू आहेस माझ्या काळजाचा
एक हिस्सा!
जळी,स्थळी, काष्टी, पाषाणी
दिसावास सदासर्वदा
इतका प्रिय !
धुवाधाँर पावसात
भिजावे तुझ्यासमवेत,
एखादी चांदणरात्र
जागून काढावी
तुझ्या सहवासात,
हातात हात गुंफून
पादाक्रांत करावा
सागरी किनारा,
असे भाग्य नसेलही
लिहिले माझ्या भाळी,
पण माझ्या वर्तमानावर
लिहिलेले तुझे नाव–
ज्याने पुसून टाकला आहे,
माझा ठळक इतिहास,
त्याच तुझ्या नावाचा ध्यास
आता मंत्रचळासारखा!
भविष्याच्या रूपेरी वाटेवर
नसेलही तुझी संगत
पण माझ्या कहाणीतले
तुझे नाव
मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतके
प्रखर आणि
सत्यमेव!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈