श्री मुबारक उमराणी
☆ कवितेचा उत्सव ☆ श्रीदत्ता… ☆ श्री मुबारक उमराणी ☆
रुप तुझेचश्रीदत्ता
माझ्या ह्दयी आहे रे
अंतरिचा धुप दीप
डोळा भरुन पाहे रे
भजनात दिनरात
मीही झालो असा दंग
माझ्या जीवनात तूच
देवा भरलास रंग
माय माहूर डोंगरी
देई मजसी आशिष
मोद भरे जीवनात
मनी उरला ना रोष
सोडुनी अमलझरी
तूच भेटण्या आलास
डोळाभर अश्रूधार
देवा तूच पुसलीस
मन झाले देवालय
नाद ब्रम्ही घंटानाद
पायघडी अंथरता
मीच धरी तुझे पाद
धुप सुगंधात देवा
कोठे तू रे दडलास ?
मेवा अमृताचा घास
माझ्यासाठी धाडलास
माझ्यासाठी चालतांना
नाही थकले रे पाय
तुझ्यासवे आली घरी
अनुसया माझी माय
परिमळ त्रिभूवनी
ब्रम्हरसपान फुला
जन्म सार्थकी पालखी
आशिषाचा दिला झुला
डोळा भरून पहाता
थांबेनात अश्रूधार
भूलचूक झाली जरी
तुच करी नौका पार
पूजाअर्चा करतांना
शोधते अमलझरी
भाजी भाकरी सेवता
माझ्या घरी दत्त हरी
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈