सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा,पूरिया,सोहोनी मारवा थाटोत्पन्न हे तीन राग! गोत्र एकच परंतु प्रत्येकाची कुंडली भिन्न, साम्य असूनही वेगळी दिसणारी! स्वभाव वेगळा, चाल वेगळी, स्वतंत्र अस्तित्व असणारी अशी ही तीन सख्खी भावंडेच!

मारवा थाट म्हणजे कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम घेऊन येणारा. अर्थातच या तीनही रागांत रे कोमल आणि म तीव्र, पंचम वर्ज्य, बाकीचे स्वर शुद्ध. अर्थातच यांची जाति षाडव~षाडव.

सगळे स्वर तेच असतांना प्रत्येक राग आपले स्वतंत्र अस्तित्व कसे काय टिकवितो हा एक मोठा प्रश्नच आहे नाही का?  याचे ऊत्तर असे की प्रत्येकाचे चलन संपूर्णपणे वेगळे आहे. दुरून येणार्‍या किंवा पाठमोर्‍या एखाद्या माणसाला आपण जसे त्याच्या चालण्यावरून अचूक ओळखतो तसेच ह्या रागांचे आहे.

ह्या लेखांत आपण मारवा या रागाचे विवेचन करूया.

मारव्याचे सर्व सौंदर्य शुद्ध धैवतात एकवटलेले आहे. या स्वराबद्धल जाणकारांत बरीच मतभिन्नता आहे. कोणी शुद्ध धैवत तर कोणी कोमल आणि शुद्ध या दोन धैवतामधील श्रुतींवर लागणारा धैवत मारव्यात असला पाहीजे असे मानतात. असा कलात्मक धैवत मारव्याचे सौंदर्य खुलवितो, अधिक मोहक रूप व्यक्त करतो. याच्या चलनांत पुर्वांगांत कोमल रिषभ व उत्तरांगांत शुद्ध धैवत प्रबळ आहे. राग विस्तार करतांना षड्जाचा कमीत कमी वापर असल्यामुळे कलाकाराची हा राग सादर करतांना कसोटीच असते. नी(रे)—ग(म)ध— (म)ध(म)ग(रे)—सा। ध आणि रे वर न्यास असे याचे स्वरूप आहे. कोमल रिषभांतून आर्त भाव उमटतात. दिवस व रात्र यांची संधि होण्याची, संधिकालीन वेळ मनाला एकप्रकारची हुरहुर लावणारी, उदास! अशावेळी मारव्याचे सूर त्यातील तीव्र मध्यमामुळे अधिकच कातर वाटतात.”पैया परत छांड दे मोरी गगरी।जाने दे पनिया भरनको शामसुंदर।।ह्या पंक्ती ऐकल्या की गोपींची आर्त विनवणी मारव्याच्या सुरांतून नेमकी समजते.

मारव्यात अनेक मराठी/हिंदी गीते संगीतबद्ध करण्यांत आली आहेत. अरूण दाते यांनी गायिलेले व र्‍हुदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला हे भावगीत मारव्याचे स्पष्ट रूप रसिकांस दाखविते. भक्तीतील करूणा आपल्याला धन्य ते गायनी कळा या नाटकांतील हे करूणाकरा ईश्वरा ह्या भजनांतून

अनुभवास येते.शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी हे सुमन कल्याणपूरचे भावगीत मारवा मधलेच!सांझ ढले गगनतले हम कितने है एकाकी ह्या शब्दांतूनच मारव्यातली ऊदासीनता दिसून येते.

अथांग सागराला भरती आली आहे,पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशांत उसळणार्‍या लाटांची गाज कानावर पडते आहे,अशा निसर्गाच्या रूपाचे दर्शन म्हणजे मारवा!

भैरवकालिंगडा,भूपदेसकार,तोडीमुलतानीप्रमाणेच मारवापूरिया ही जोडी प्रसिद्ध आहे.

पुढील लेखांत आपण पूरिया रागाविषयी बोलूया.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments