श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – ताईता बंधुराजा  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

बाळराजा आणि भ्रातार याच्या पाठोपाठ, विपुल ओव्या सापडतात, त्या बंधुजीबद्दल लिहीलेल्या. बंधुजी कसा? तर गळ्यातला ताईत जसा. ताईत जसा अगदी जवळ गळ्याला लागून बांधलेला असतो, तसाच भाऊ मनाच्या अगदी जवळ, मनाला बिलगून असतो. ताईत, इडा-पीडा, आंनिष्टापासून रक्षण करतो, असा मानलं जातं, भाऊदेखील तसाच रक्षणकर्ता असणार, याची खात्री असते. म्हणूनच अशा ’ताईता बंधुराजाच्या प्रेमाच्या मायेच्या तिने खूप खूप ओव्या गायल्या आहेत. त्यातून त्याच्या रुबाबाचं, दिलदारपणाचं, त्याच्या कर्तृत्वाचं वर्णन केलय. ‘आटपाट नगराचा। भाऊ माझा ग राजा। टोलेजंग इमारत । भरजरी गाजावाजा।।‘ यात भावाच्या कर्तृत्वाचं आणि रुबाबाचं दोन्हीचं वर्णन आहे. त्याची टोलेजंगी इमारत आहे. गावात त्याचा ‘गाजावाजा’ आहे. काइतुक, आदर, कीर्ती असं सगळच त्या ‘गाजावाजा’ शब्दातून व्यक्त होतय. गाजावाजा तिला भरजरी वाटतो. म्हणजे नजर्दीपावणारा वाटतो. ‘भरजरी’ हाशब्द भावाची समृद्धी व्यक्त करण्यासाठीही आलेला असेल.

बहीण – भावाचं प्रेम कसं? तर ती म्हणते, सीताफळासारखं. ‘फोडील ग सीताफळ। आत साखरेची काया।।

बहिणीचा लग्न होतं. ती सासरी येते. साना-वाराला तिला माहेरी न्यायला भाऊ मुराळी येतो. बहीण मनोमणी हरखते.  त्याचं आदरातिथ्य, त्याचा पाहुणचार किती करू आणि किती नको, असं तिला होऊन जातं. ‘पंचामृताचं जेवण।याला गुळाचं लेवण। असा जेव माझ्या बंधू । भाऊबीजेचं जेवण।। तो उशिरा आला, तिन्हीसांजेला आला, तरी त्याच्यासाठी काही करणं तिला जड जात नाही. अनारशासारखा किचकट वेळखाऊ पदार्थ करण्याचीही तिची तयारी आहे.

आपल्या भावाचा रुबाब राजासारखा आहे, हे सुचवताना ती म्हणते, बंधू पाहुणा आला तर,

‘सया ग म्हणती कोण राजा? राजा ग नव्हे त्यो ग बंधू माझा।।

आपला हा बंधू दिलदार असल्याचही ती सांगते. कसा? ‘काळी नि ग चंद्रकळा। एका धुण्यानं झाली गोळा।‘ तर ‘धाकल्या बंधुजीनं दिलं रुपये साडे सोळा।।’ असा मायेचा बंधुजी आणि माया का असणार नाही? अखेर ‘अशी ना बहीण भावंड । एकया झाडाची संतर ‘ च ती. एका झाडाची संत्री, एका झाडाची फुलं, फळं आशा तर्‍हेचं वर्णन ओव्यातून येतं.

अशा या राजस भावाला परदेशी सांभाळ असं ती सूर्यनारायणाला विनवते. ‘नारायण बाप्पा तुला सोन्याचं कमळ। भाई राजसाळा माझ्या परदेशी सांभाळ।।’ तसच ती आई लक्ष्मीला विनवते, ‘आई तू सोन्याच्या पावलांनी ये आणि माझ्या बंधूचा धरला पालव तू सोडू नको.’ भावाची भरभराट पाहून बहिणीला समाधान वाटतं. ‘ती म्हणते, ‘लक्ष्मीबाई आली पांगळया पायाची। बंधूला केली बोली नाही फ्रून जायाची।।

अशा या राजबिंडया भावाचं लग्नं होतं. लाडा -कोडाची भावजय घरात येते. शहाणी, समजुतदार नणंद म्हणते,

‘काई बंधुजी ग आपाइला। भावज का लोकाची कशी म्हणू। बचा नागाची ती ग पद्मीण।।‘

हा समजूतदारपणा दुही अंगी हवा पण भावजय हळू हळू आपले रंग दाखवू लागते.  तरी पण सामोपचाराने घेत ती म्हणते, ‘आपुल्या सोन्यासाठी चिंधी करावी जतन।’ भाऊ सोन्यासारखा तर भावजय चिंधीसारखी. सोन्यासाठी तिला सांभाळायलाच हवीजुन्या काळात जुन्या फाटक्या कपड्यांच्या चिंध्या म्हणजे त्या काळातला बायकांचा लॉकरच. निगुतीनं त्यात सोनं बांधून ठेवायचं. त्यासाठी चिंधीही सांभाळून ठेवायचे. म्हणजेच भावासाठी भावजयीला ही मान द्यायचा. बहीण-भाऊ एका झाडाची संत्री खरी, पण भावजय आली आणि तिने अंतर पाडलं. ‘अशी साखरची पुडी। कशी मुंग्यांनी वेढीली। भावाला होती माया। भावजयीनं तोडली ।।

भावा-बहीणीतलं अंतर हळू हळू इतकं वाढत जातं की आता तो तिला माहेरीदेखील न्यायला येइनासा होतो. सणाला बाकीच्या माहेरी चालल्या आहेत. भाऊ मुराळी त्यांना घेऊन जातोय. आपल्या दारावरून आशा किती तरी गाड्या जाताहेत. आपल्या दाराशी मात्र गाडी  थांबत नाही, याची खंत ती सूचकतेने व्यक्त करते.

‘माझ्या ग दारावरनं। रंगीत गाड्या गेल्या। भावानं बहिणी नेल्या । दिवाळीला ।।

बाईला कधी तरी माहेरी जावसं वाटतच. पण तिथे काय अनुभव येतो?

‘आई- बापाच्या ग राजामंदी। दुधा ग तुपाची केली न्याहारी। भाऊ नि भावजयच्या राजामंदी। शिळ्या ताकाची मला चोरी।।

आता दिवस बदलले आहेत. भाऊ वेगळा राहू लागलाय. ते पाहून तीदेखील कष्टी होते.

‘काई मावबिगळ्याच्या घरी। भाच्या बाळाची ग सवती खोली। काई ग धाकट्या बंधुजीनं। निम्म्या राज्याची केली बोली।।

हे सगळं भावजयीमुळे झालं, असंही तिला वाटत राहतं. अर्थात सगळ्याच जणी काही आशा घर मोडणार्‍या आणि माणसं तोडणार्‍या नसतात. अशा पद्मिनीचं गुणगानही ओव्यातून केलेलं आढळतं. सुंदर, तरुण, गुणी बाईसाठी पुष्कळदा ‘पद्मीनी’ असं अनेक ओव्यातून म्हंटलं गेलय.

कसंही झालं, तरी एक तरी भाऊ हवाच, असं बाईला आसासून वाटतं. एका अहिराणी ओवीत म्हंटलय,

‘दुबळा पाबळा बंधू बहिणीले असावा। पावलीनी चोळी एक रातना विसावा।‘ अगदी अशीच एक ओवी कोल्हापूरच्याकडे ऐकायला मिळाली.

‘काई बहिणीला भाऊ बाई। एक ग तरी असावा। काई चोळीचा एक खण। एक रातीचा ग विसावा।।

क्रमश:  पुढील लेखात आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 1 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments