सौ.अस्मिता इनामदार
☆ कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆
कर्णासारखा उदार दाता
आजच्या कलियुगात नाही
माझे ते माझे, तुझे तेही माझे
असेही म्हणणारे आहेत काही…
तीर्थक्षेत्री करूनी दान
पुण्य मिळवती सारेजण
इतर वेळी पापे करूनी
आनंद मिळवती काहीजण…
देवा-धर्माच्या नावाखाली
लूटच करती या जगती
दानाच्या त्या पावित्र्याला
नष्ट करणे ही प्रगती…
यापरतेही अनेक दाने
जगी आहेत, जाणूनी घ्या
त्या दानातून मिळणाऱ्या
समाधानाचा लाभही घ्या…
दानाचेही प्रकार अगणित
द्रव्यदान वा रक्तदान
या साऱ्याहून श्रेष्ठतम ते
ते म्हणजे हो नेत्रदान…
अंधकार तो नयनापुढचा
क्षणात एका होईल दूर
नेत्रदानाचे पुण्य घेऊनी
आनंदाला येईल पूर…
त्या दानातून कुणी अभागी
पाहील जग हे डोळेभरूनी
आयुष्याच्या वाटेवरती
चालत राहील दुवा देऊनी…
© सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈