श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 85 ☆
☆ भावुक नाते ☆
तारुण्याला आज धुमारे फुटले होते
काळजात या हृदय कुणाचे रुतले होते
फूल सोडुनी पानावरती भुंगा बसता
भुंग्यावरती फूल गुलाबी रुसले होते
कोकिळ गाता कैऱ्यांनी हे झाड डवरले
अन् फांदीचे खांदे थोडे झुकले होते
तुला पाहुनी दयाळ पक्षी शीळ घालतो
नाही वाटत त्याचे काही चुकले होते
नवीन वाटा तयार झाल्या भटकंतीला
हुंदडताना भान जरासे सुटले होते
ओली वाळू पायावरती घरटे कोमल
भावुक नाते संसाराशी जुळले होते
प्रेम कोरडे कधीच नव्हते या लाटांचे
वाळूखाली बरेच पाणी मुरले होते
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अति सुन्दर अभिव्यक्ति