☆ कवितेचा उत्सव ☆ विशाल खंत ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर ☆
(नेहमीपेक्षा “वसंत हा ऋतु” वेगळ्या पध्दतीने मांडला आहे. एका कैदीच्या नजरेतून हा वसंत कसा आणि का वेगळा वाटतो हे या कवितेतून तो व्यक्त करताना जाणवतो.)
गजाआड असताना
तुझा जन्म झाला रे
येई चैतन्याचा वारा
हितगुज करण्या रे,१
कोवळा तुझा ऋतू
जैलमध्ये डोकवायचा
कैदी मी असल्याचा
तेव्हा विसर पडायचा, २
लतिकेची पालवी
अप्रुप वाटे लोचनांना
रोजचे पक्षीकूजन
मधूर वाटे कर्णांना,३
तुझ्यासम सोशीक
कोणी कसं असावे
तळत्या उन्हांतही
धुंदीत बहरावे,४
हो आपल्यातला
संवाद लागला झुलू
जन्मठेपेची शिक्षा
कसं,केव्हां रे बोलू?,५
तुझ्यासारखे नाही
माझे निसर्गाशी नातं
पुन्हा माझा जन्म नाही
हीच विशाल खंत ,६
अढळ मोहोरचा अंत
येतो जेव्हा जवळ
वसंता तू रे रडतो
तेव्हा कुणाजवळ ,७
© सुश्री स्वप्ना अमृतकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈