सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ आमची अंदमान सफर… भाग-2 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
अंदमानची उर्वरित सफर…
हॅवलॉक आयलंड..
पोर्ट ब्लेअर च्या सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सेलर जेलच्या दर्शनाने भारावून गेलो होतो. पण आता निसर्गाच्या सानिध्यात समुद्रावर फिरून काही दिवस तोही अनुभव घ्यायचा होता. पोर्ट ब्लेअरच्या आसपास समुद्रात बरीच बेटे आहेत. त्यापैकी हॅवलॉक आयलंड या ठिकाणी आम्ही जाणार होतो. एक दिवस माउंट हॅरियट येथे जाऊन आसपासचा अप्रतिम सुंदर निसर्ग पाहिला. गन पॉईंटवर फोटो काढले. ‘सागरिका’ म्युझियम पाहिले आणि हॅवलॉक आयलँड ला जाण्यासाठी तयार झालो.
हाय लॉक आयलँड ला जाण्यासाठी प्रथम समुद्रातून बोटीने साधारणपणे दीड तास प्रवास केला व पुढे कारने काही अंतर जाऊन ब्ल्यू रिझाॅर्ट या ठिकाणी पोहोचलो. इथून अगदी जवळ होता. त्यामुळे संध्याकाळी साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बीचवर आम्ही चालत गेलो. सेल्युलर जेल पाहून आलेला गंभीरपणा नकळत जाऊन निसर्गाच्या या रम्य रूपात रमून गेलो. समुद्रकिनाऱ्यावर बरीच गर्दी होती. पाण्यात खूप वेळ खेळायला मिळाले. सूर्यास्त होत आल्यावर दिसणारे सागराचे घनगंभीर रूप डोळ्यात साठवले गेले. सूर्यास्त लवकर म्हणजे साडेपाच वाजता सूर्यास्त झाला की बीच बंद होत असल्याने पोलीस गाडी घेऊन सर्वांना बाहेर काढले जाते! आम्ही येताना गोड पाणी आणि खोबरे खाऊन रेसोर्ट वर आलो. त्या दिवशीचा मुक्काम तिथेच होता. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा समुद्राला भेटायला जाऊन आलो. सकाळी नाश्ता करून एलिफंटा बीचवर जाण्यासाठी प्रथम कारने आणि पुढे छोट्या बोटी ने एक दीड तास प्रवास करायचा होता. समुद्राचे रूप कितीदा आणि कितीही पाहिले तरी मनोहारी वाटते. इथे तर पाण्याचा रंगही बदलताना दिसत होता. कुठे पाचू सारखा हिरवा रंग तर कुठे निळा, ग्रे कलर दिसत होता.
क्रमशः…
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
छान लिहिलंय