☆ कवितेचा उत्सव ☆ सन्मान ☆ श्री प्रकाश लावंड ☆
त्याला स्मशानात पोहचवून
त्याचे सगेसोयरे
मैतर शेजारी पाजारी
परत फिरले
तेव्हा आकाशातून
एक दिव्य पालखी खांद्यावर घेऊन
पंच महातत्वे उतरली
त्याला पालखीत बसण्याची
विनंती करून हात जोडून
उभी राहिली
तो चकित होऊन
पालखीत बसला
आकाश जल अग्नि पृथ्वी
पालखीचे खांदेकरी झाले
वायु चवरी ढाळू लागला
त्यानं आर्ततेनं
नशिबाला प्रश्न केला
हे प्राक्तना
एवढा मोठा सन्मान होण्यासाठी
आयुष्यभर
अपमानित होत जगावं लागतं ?
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
वाकई सही अभिव्यक्ति