सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जे मनामनाला जोडते ते नाते

जे चराचराला जोडते ते नाते !!

असंख्य वेगवेगळी नाती जन्मापासून आपल्याला अवघ्या विश्वाशी बांधून टाकतात. या प्रत्येक नात्याचे

रूप वेगळे,भाव वेगळा,

रीत वेगळी प्रीत वेगळी !

आपण आयुष्यात असंख्य नात्यांनी एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. या प्रत्येक नात्याचे स्थान, त्याचे महत्व, त्याची गरज, त्याचे निभावणे हे वेगवेगळे असते.

सर्वात प्रथम आपण ईश्वरीतत्त्वाशी बांधले गेलेलो असतो. त्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे असते ते आई-वडिलांचे श्रेष्ठ आणि पवित्र नाते.

 माय-बाप असती

 सर्वस्व या जन्माचे

 त्यांच्यामुळेच होई

 सार्थक या जीवनाचे !!

आई-वडील आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम शिक्षण यांची मौल्यवान शिदोरी देऊन या विश्वाच्या प्रवासाला सोडतात. त्यामधे आपल्या आयुष्याची भावनिक बाजू ही आईने तर व्यावहारिक बाजू वडिलांनी व्यापलेली असते. व्यवहार म्हटले की रूक्षपणा आलाच. पण सर्वच गोष्टी नुसत्या भावनेवर चालत नाहीत तर व्यवहार हा पहायलाच लागतो. त्यामुळेच वडील थोडे कठोर वाटतात. पण नारळातले पाणी किंवा फणसातल्या गऱ्यांप्रमाणे त्यांचे मन असते.

‘दुधावरची साय’ म्हणजे तर संसाराचे संचित असते. नातवंडे ही आजी-आजोबांचे सुख निधान असतात, तर नातवंडांना आजी-आजोबा अतिशय प्रिय असतात. आजच्या बदलत्या वातावरणात नातवंडे पाळणाघरात तर आजोबा वृद्धाश्रमात हे दुर्दैवी वास्तव आहे.तरीही दोघांना एकमेकांची ओढ असते म्हणूनच ते एकमेकांना भेटायची कारणेही हुडकत असतात.

आपल्या आयुष्यातले आणखी एक लोभस नाते आहे मैत्रीचे. मैत्री अखंड विश्वासाची साथ देते, कायम मदतीचा आधाराचा हात देते, निरपेक्ष प्रेम देते. असे मैत्र  ज्यांना लाभते ते खरच भाग्यवंत असतात. मैत्रिणीने,’ मी आहे ना? काळजी करू नको,’ असे नुसते म्हटले तरी हे शब्द आपल्याला संजीवनी सारखेच वाटतात.

आपल्या वाटचालीत आपल्या मदतीला येते ती आपली कामवाली सखी. अनेक वर्षांच्या सहवासाने आपणही तिच्याशी एखाद्या मैत्रिणी सारखे वागू लागतो.तिच्याजवळ मन मोकळे करू लागतो. ती पण स्वत:ची सुखदुःखे आपल्याशी वाटून घेते आणि कामाबरोबरच जीवाला विसावा शोधत रहाते.

अशी असंख्य नाती आपण रोजच्या जगण्यात निभावत असतो.

निसर्गाशी आपले नाते हे तर जिवाभावाचे असते. निसर्ग आपला माय बापच आहे. तो आपले पालनपोषण करतो, रक्षण करतो. त्यामुळे त्याचेही संवर्धन, रक्षण करणे हे आपले महत्त्वाचे  कर्तव्य ठरते.

आपण अशा रीतीने आपल्या आयुष्यात घरातल्या, घराबाहेरच्या,निसर्गातल्या घटकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधले गेलेले असतो. या प्रत्येक नात्याचा रंग वेगळा, गंध वेगळा, प्रत्येकाची नजाकत वेगळी आणि त्यामुळेच त्यातून मिळणारी अनुभूती पण वेगळीच असते.

“पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते.

नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण असते.”

म्हणूनच आपल्याला लाभलेल्या नात्यांची समृद्धी आपण जपली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, मदत करणे, एकमेकांचे विचार नाही पटले तर सोडून देणे, माफ करणे अशा अनेक गोष्टींनी ही नाती जपणे शक्य आहे. असे म्हणतात ज्यांना आयुष्यात शांती हवी असेल  त्यांनी वादविवादात एक पाऊल मागे घ्यावे. पण इतरांकडून ती अपेक्षा करू नये. त्यामुळे आपण नात्यांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरांच्याही आनंदात भर घालू शकतो.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments