श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ खंत एका मातेची… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
माहित आहे मला तु येणार नाही
माझी घालमेल तुला कळणार नाही
अंतरीचा काहूर कुणाला मी सांगू
किती रात्री आठवणींनी मी जागू
हट्ट माझाच होता तू परदेशी जावे
आलेख तुझा वर चढता बघावे.
पण तुला न कळली आईची भाषा
भेटण्याची तुला माझी वेडी आशा
मला खंत नाही तुझ्या निर्णयाची
जननी जन्मभूमि ला न भेटण्याची
पण कसे समजावू मी मनाला
तू जागला न दुधाच्या गोडीला
जीवन तुझे समर्पित पैश्या च्या ओढीला.
पटेल गांधी सावरकर ही गेले
पण देशा ते कधी ना विसरले
ओढ तिथली कधी ना लागली
काया तयांची मातीला जागली
मने तुमची ही कशी रे घडली
माया आमुची कुठेरे नडली
तुम्हा कशी ओढ आईची वाटेना
आठवणीने तिच्या कंठ दाटे ना
विचार कर तू भावनिक काही
पालटून अपुला भूतकाळ पाही
अपेक्षा मला अशी फार नाही
नजरेत ये, नको घेऊ कष्ट काही
फक्त तिर्डी चा माझ्या भार वाही
दे अग्नी, नी हो दुधाला उतराई.
तेव्हढीच घे तसदी झाली रे घाई
मग जा बाळा परतुनी …
परतुनी मी पाहणार नाही…
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈