कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 76 – विजय साहित्य – जीवनाचे गीत…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
सांजावला दिनमणी,
आता रजनीची शाल.
तुझ्या सोबतीने सरे
सुखदुःख भवताल …!
असा जीवनाचा सुर
अंतरात निनादतो
आठवांच्या पाखरांनी
आसमंती विसावतो …!
अशा संधीकाली गाऊ
जीवनाचे गीत नवे
ऐकायला जमलेत
आपलेच स्वप्न थवे…..!
तने दोन, एक मन,
प्रेम प्रीती जुने नाते.
तेजोमय भविष्याची,
वाट जोगिया हा गाते …!
दूर करण्या अंधार,
अशी रम्य वाटचाल
कधी ज्ञानाचा प्रकाश,
कधी प्रकाशाची शाल…!
सुरमयी सजे आभा,
लावू पाठीला या पाठ
स्वप्न मयी, कवडसे
बांधियली सौख्य गाठ…… !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈