सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – नास्तिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
रोमाच्या यजमानांच्या गाडीला मोठा अपघात झाला. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. आणि त्यामुळे आज सगळं घरच रोमाकडे ‘खाऊ की गिळू‘ अशा संतप्त नजरेने पहात होते.
“नास्तिक कुठली. माझ्या मुलाला मारून खाऊन टाकलंस तू.”…. रोमाची सासू आक्रोश करत होती, आणि पुन्हा पुन्हा त्या दिवसाचा उद्धार करत शिव्याशाप देत होती. त्या दिवशी रोमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच आलेल्या ‘कडवा चौथ‘ या व्रताबद्दल तिने रोमाला सांगितलं होतं की – ” सूनबाई, उद्या तुला हे व्रत पाळायचे आहे. चंद्रोदय होई – पर्यंत तू पाणीही प्यायचे नाहीस”.
रोमाला त्यासारख्या सगळ्या चालीरीती माहिती होत्या. ती व्यवहारदक्षही होती. पण तिच्या शिक्षणाने तिला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, ती गोष्ट योग्य की अयोग्य याचा विचार करणं हा तिचा स्वभावच झाला होता. त्यामुळे तेव्हा तिने सासूला सांगितलं होतं की…”सासूबाई, माझ्याच्याने इतकं कठीण व्रत केलं जाणार नाही. त्यातून मला पित्ताचाही त्रास आहे. पूर्ण दिवसभर मी पाणीही प्यायले नाही तर माझी तब्बेत बिघडेल”
“हे बघ, हे व्रत तुझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी आहे”.
“सासूबाई, मी व्रत केल्याने यांचं आयुष्य कसं वाढू शकेल?”… रोमाने त्यांनाच प्रतिप्रश्न केला होता.
“हे बघ सूनबाई, कितीतरी शतकांपासून हा रिवाज चालत आलेला आहे”
“असेलही. पण मी अशी थोतांड मानत नाही. जन्म मृत्यू आधीच ठरलेले असतात. आणि तुम्ही म्हणता तसे होत असते ना, तर हे व्रत करणाऱ्या देशातल्या सगळ्या बायका कायम सौभाग्यवतीच राहिल्या असत्या.”
रोमाच्या या युक्ती – वादापुढे तिची सासू त्यावेळी काहीच बोलू शकली नव्हती. पण आज मात्र फक्त सासूच नाही, तर इतर सगळेच रोमाला दोषी ठरवत होते.
… आणि रोमा आजही हाच विचार करत होती की…. ‘मान्य आहे मी ते व्रत केलं नाही. पण सासूबाई तुम्हीतर किती वर्षांपासून मुलांसाठी कसली कसली व्रते करता आहात. आणि वड पौर्णिमाही करता आहात ना ?…..”
मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈