सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“ममा, ममा, आज ना मी पिट्टूला मेथीची भाजी भरवली.”
“खाल्ली त्याने की थुंकून टाकली?”
“अगं ममा, मिटक्या मारत खाल्ली. आणखीसुद्धा मागितली.”
“काय सांगतेस?”
“ममा, मी टू इअर्सची होते, तेव्हा मी खायचे का ग मेथीची भाजी?”
“दोन वर्षाची असताना तू दूधभाताचाच हट्ट करायचीस. आत्ताआत्ताशी कुठे सहावं वर्ष लागल्यापासून मॅडम स्वतःहून भाजी खायला लागल्याहेत.”
तेवढ्यात आरतीच्या लक्षात आलं -मघापासून आपण आणि जुईच तेवढ्या बोलतोय. समर, आई, बाबा तिघंही टेन्स दिसताहेत.
जुई उठून गेल्यावर आईंनी सहजच बोलल्यासारखं विचारलं, “मग काय ठरवलंयस तू, आरती?”
“कशाबद्दल म्हणताय, आई?”
“प्रमोशनबद्दल.”
“अप्लाय तर केलंय. आता अभ्यास करायला कसं जमतं, ते बघायचं. समर, तू असं कर ना. तू डिटेलमध्ये वाचशील ना, त्याच्या थोडक्यात नोट्स काढ. म्हणजे मला तेवढ्याच वाचल्या तरी पुरे. मला अभ्यासाला जास्त वेळ मिळेल असं वाटत नाही.”
“तुला वेळ मिळत नाही आणि तो रिकामटेकडा आहे?”सासू एकदम वाकड्यात का शिरली, तेच आरतीला कळेना.
ताटात होतं, तेवढंच बकाबका गिळून समर उठून गेला.
“बघितलंस? अर्ध्या जेवणावरून उठून गेला “-आईंनी आरतीलाच बोल लावला.
मग आरतीही काही न बोलता जेवत राहिली. बाबा तर निःसंग स्थितप्रज्ञासारखे कशातच पडायचे नाहीत.
आईंनी थोडा वेळ जाऊ दिला आणि परत एकदा मुद्द्याला हात घातला,”मी काय म्हणतेय आरती, तू तरी त्याला जरा समजून घे.”
“म्हणजे?”
“म्हणजे असं की, तो प्रमोशनच्या परीक्षेला बसतोय, तर त्यालाच बसू दे. म्हणजे त्याला एकट्यालाच बसू दे. तू कशाला बसतेस? आधीच तुझ्यावर मुलांची जबाबदारी आहे. आणि ह्या पोस्टवरच एवढं काम असतं. घरी यायला इतका उशीर होतो!मग आणखी वरची जागा मिळाली तर बघायलाच नको.”
बाबांनी जेवताजेवता मान वर करुन या सासूसुनेकडे बघितलं आणि पुन्हा खाली मान घालून जेवायला सुरुवात केली. कदाचित त्यांना कोणाची बाजू घ्यावी, ते कळलं नसेल किंवा हिंमत नसेल झाली.
समर आणि आरती दोघंही एकाच बँकेत होती. समरचं पहिलं प्रमोशन लग्नापूर्वीच झालं होतं. आरतीने मात्र जुई झाल्यावर प्रमोशन घेतलं होतं. खरं तर जुई तेव्हा खूप लहान होती. पण कोणालाही त्यात काही गैर वाटलं नव्हतं. मग आत्ताच ह्यांना आपलं प्रमोशनसाठी प्रयत्न करणं आक्षेपार्ह का वाटावं? आरती जेवताजेवता विचार करत होती.
“पुरुषाची गोष्ट वेगळी, बाईची गोष्ट वेगळी,”आई बोलतच होत्या,”त्याची बाहेरगावी कुठे बदली झाली, तर तो एकटा जाऊन राहील आणि दोघांचीही झाली तर सगळेच जाऊन राहाल. पण समजा, तुझी एकटीचीच बदली झाली, तर तू मुलांना घेऊन एकटी कुठे जाणार?”
आता मात्र आरतीला चीड आली. समरची बदली झाली, तर तो एकटा जाणार आणि माझी बदली झाली, तर मी मुलांना घेऊन जायचं? म्हणजे मुलांची जबाबदारी फक्त माझीच आहे? ती काय माझ्या एकटीचीच आहेत?
आरती काहीतरी सणसणीत बोलणार होती. तेवढ्यात जुई धावत आली.”ममा, ममा, मला आणि पिट्टूला झोप येत नाही आहे. तू लवकर चल आणि आम्हाला स्टोरी सांग. ”
मग वाद घालण्याच्या भानगडीत न पडता आरतीने पटापट मागचं आवरलं आणि ती मुलांना झोपवायला गेली.
क्रमश:….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈