श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ दोन आया ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
त्या दोघींनाही एक एक मुलगी होती. त्यांचा पालन-पोषण करण्यासाठी त्यांना नोकरीची गरज होती. नोकरी मिळतही होती. नोकरी चांगली होती. पगारही चांगला होता. पण ती मिळवण्यासाठी एक अट होती. अट अशी होती की ती मिळवण्यासाठी मॅनेजरला एक तर दहा लाख रुपये द्यायचे किंवा मग स्वत:ला तरी त्याच्या स्वाधीन करायचं.
पहिलीने एकदा आपल्या मुलीकडे बघितलं आणि ती निघून गेली. परत आली तेव्हा तिच्या हातात नियुक्ती-पत्र होतं. तिने मोठ्या गर्वाने मुलीकडे बघितलं, आणि मनातल्या मनात म्हणाली, ‘बघ! घर विकून नोकरी मिळवलीय. तुझ्या आईने घर विकलं, पण स्वत:ला नाही विकलं. नोकरी चांगली आहे. तू मोठी होईपर्यंत घरही होईल.’
तिने मुलीचा मुका घेतला आणि तिला आपल्या छातीशी कवटाळून धरलं.
दुसरी जवळ विकायला घर नव्हतं. तिने क्षणभर मुलीकडे बघितलं आणि तीही निघून गेली. ती परत आली, तेव्हा तिच्याही हातात नियुक्ती-पत्र होतं. तिनेही काहीशा गर्वाने मुलीकडे पाहीलं आणि मनातल्या मनात म्हणाली, ‘ बघ बेटा, मी स्वत:ल विकून नोकरी मिळवलीय. काय करणार? माझ्याकडे विकायला घर नव्हतं ना! नोकरी खूप चांगली आहे. तू मोठी होईपर्यंत आपलं घर बनेलच आणि मग तू जेव्हा मोठी होशील ना, तेव्हा नोकरीसाठी विकायला तुला आपले घर असेल. तुला स्वत:ला विकायची वेळ येणार नाही.’
तिनेही मुलीचा मुका घेतला आणि तिला आपल्या छातीशी कवटाळून धरलं.
मूल कथा – दो माँएं – मूल लेखक – श्री घनश्याम अग्रवाल
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈