सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

त्या काळाच्या मानाने जयंती बाईंचा प्रथम विवाह उशिरा झाल्यामुळे त्यांना फार मानसिक आघात सहन करावे लागले होते. शिवाय वर्षाच्या आत पतीच्या  मृत्यूचा  आघात त्याच्यावर झाला. रखमा बाईंच्या वाट्याला असे कटू अनुभव नकोत असे त्या मातृहृदयाला वाटले असावे. म्हणून केवळ त्यांच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी नात्यातील दादाजी नावाच्या एकोणीस वर्षाच्या मुलाशी करून दिला. परंतु त्यांच्या मनात रखमा बाईंच्या या विवाहाची सल कायम होती.विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहत होत्या.आणि दादाजी व त्यांची आई दादाजींच्या मामाकडे राहात होते. दादाजी फारसे शिकलेले नव्हते. बुद्धी बेताची होती. प्रकृतीच्या कुरबुरी नेहमी असत. त्यांच्या मामांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुठल्याही सामाजिक निकषावर दादाजी रखमाबाईंनी साठी योग्य जोडीदार नव्हता.  फक्त हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले म्हणून तो रखमावर पत्नी म्हणून अधिकार सांगे. रखमाबाई कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या.डॉक्टर सखाराम राऊत यांच्या घरात वैचारिक व आर्थिक संपन्नता होती. आपल्या पित्याप्रमाणे डॉक्टर बनण्याचे स्वप्न  रखमाबाईनी पाहिले होते. डॉक्टर सखाराम यांना समाजात खूप मान होता. त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता.तो पुरोगामी व प्रागतिक विचारांचा वारसा रखमाबाईना मिळाला. दादाजी व रखमाबाई यांच्यात वैचारिक,बौद्धिक आणि आर्थिक दरी होती. रखमाबाईंची या विवाहाला संमती नव्हती. मुलीला तिचा पती निवडण्याचा हक्क हवा अशी त्यांची विचारधारा होती. बालविवाहा मुळे त्यांचा हा हक्क हिरावला गेला.दादाजी रखमासाठी अनुरूप नाहीत म्हणून डॉक्टर सखाराम व जयंतीबाई तिला सासरी पाठवण्याचे नाकारत असत.

लग्नानंतर आठ वर्षांनी दादाजींनी रखमाबाईवर हाय कोर्टात केस दाखल केली बॉम्बे हायकोर्टात,न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर रखमाबाईंनी स्पष्ट निवेदन केले. त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे.कमी शिकलेला, सतत आजारी असलेला, मामावर अवलंबून असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला असा हा पती माझे पालनपोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीच वाटत नाही. नवरा म्हणून त्याला  स्वीकारणे मला मान्य नाही.’

संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी खटल्याचा निकाल दिला. ‘रखमाबाई आणि  दादाजी यांचे वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याने ते विस्थापित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, अल्पवयात आई-वडिलांनी लग्न लावून दिल्यानंतर, मुलीला जेव्हा समज येते,तेव्हा तिची इच्छा नसताना,तिला पती नावाच्या माणसाकडे रहायला जाण्याची सक्ती करणे हा अत्यंत क्रूरपणा आणि रानटीपणा आहे असे मी मानतो.’

न्यायमूर्ती पिन्हे यांनी असा निकाल दिल्यानंतर रखमाबाईवर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव झाला आणि तेवढीच त्यांच्यावर आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली.

इंडियन स्पेक्टेटर, केसरी आणि नेटिव्ह  ओपिनियन यासारख्या वृत्तपत्रांनीही टीका केली.  हिंदू धर्मशास्त्राने मान्यता दिलेला विवाह बेकायदेशीर ठरविण्याचा इंग्रजांचा कायदा हा हिंदूंच्या समाजजीवनास अत्यंत घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना, पश्चिम राष्ट्रां प्रमाणे, स्त्रियांची संमती आवश्यक नाही. नेटिव्ह  ओपिनियन या वर्तमानपत्राने आपल्या 11:10. 1885 च्या बातमीत या निकालाची खिल्ली उडवताना असे म्हटले की, आपण नेटिव लोक बायकांविषयी इतकी प्रतिष्ठा ठेवणारे मुळीच नाही. एक नाही तर दुसरी, दुसरी  नाही तर तिसरी बायको मिळेल. देशात काय वाण पडली आहे का बायकांची?’

अशावेळी रखमाबाईंनी साथ देण्यासाठी काही समाजसुधारक, विचारवंत पुढे आले. बेहरामजी मलबारी, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकाराने’ हिंदू लेडी’ संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी भारतातील पुरुषी श्रेष्ठत्वाचे राज्य, पुरुषी अहंकार, स्त्रीचे अ लिखित दास्यत्व यावर टाइम्स ऑफ ऑफ इंडिया मधून घणाघाती आघात केले. स्त्रियांना घरात तसेच कायद्याने कसलीही सुरक्षा नाही. त्यांचा कोणी पाठीराखा नाही. वयात आल्यावर, किंवा बारा वर्षाच्या मुली लग्नाच्या राहिल्या तर त्या कुटुंबाला तुच्छतेने वागविले जात असे. प्रौढ वयात लग्न म्हणजे बारा वर्षानंतर लग्न हा सामाजिक आणि धार्मिक गुन्हा मानला जाई.बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची पद्धत अस्तित्वात होती.सती जाणार्‍या स्त्रीचे आक्रंदन  ऐकवत नसे. स्त्रियांची दुखे, बालविवाह, केशवपन,जरठ विवाह, सती जाणे किंवा वैधव्य आल्यावरचे स्त्रियांचे अंधारे आणि मुके जीवन यावर समाजमन जागृत करण्यासाठी रखमाबाईंनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने घणाघाती लेखन केले. समाजाच्या हिंस्त्र मनोवृत्तीवर कोरडे ओढले. पुरुषी समाजव्यवस्थेला मार्मिक प्रश्न विचारले. या विषयांवर त्यांनी 26 जून 1885 रोजी बालविवाह, 19 सप्टेंबर 1885 रोजी सक्तीचे वैधव्य यावर लेख लिहिले. या लेखामुळे सर्वत्र खळबळ माजली. या पत्रात् त्यांनी स्त्रियांना दिलेला अतिनिम्न दर्जा,स्त्रियांचे वस्तुरूप स्थान, स्त्रियांना दिली जाणारी अमानुष वागणूक, त्यांना विवाहात दान देण्याची संकल्पना, आणि स्त्रीचे भयग्रस्त गुलामी जीवन, स्त्री म्हणजे पुरूषाच्या सुखाचे साधन अशा तत्कालीन  समाजमनावर प्रहार केले.  यामुळे पुरुषप्रधान समाज चिडला. सक्तीचे वैधव्य यामध्ये तर त्यांनी नागाच्या फण्यावर पाय ठेवल्यासारखे लेखन केले. स्त्रियां सारखेच,पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवले जात नाही ?असे त्यांनी लिहिले.हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला. मृत्यू पावलेल्या  पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना दुसरा असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कुणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. टाइम्स ऑफ इंडिया मधून ‘हिंदू लेडी ‘या  टोपण नावाने लढा दिला. टाइम्स ऑफ इंडियावर  हिंदू लेडीचे नाव जाहीर करण्यासाठी दबाव आला. पण रखमाबाईंनी कुणालाही भीक घातली नाही.लेखनाच्या मार्गाने लढा दिला.हा दीडशे वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढयाचे महत्व लक्षात येते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments