सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

जेवणं, मागचं आवरल्यावर रोजच्यासारखं आरतीने मुलांना झोपवलं. समर हॉलमध्ये मॅच बघत बसला होता. आरती किचनमध्ये आली. आई डायनिंग टेबलशी  कसलंतरी पुस्तक वाचत बसल्या होत्या. आरती येताच खूण घालून पुस्तक मिटत त्यांनी विचारलं, “झोपली मुलं?”

“हो.” आरती शेजारच्या खुर्चीवर बसली आणि तिने बोलायला सुरुवात केली.

“आई, तुमच्या म्हणण्यावर मी खूप विचार केला आणि ठरवलं की, प्रमोशनचा विचार सध्यातरी मनातून काढून टाकायचा. पण तरी मनात काही प्रश्न उरलेच. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांची उत्तरं सापडेनात. डोकं भणभणायला लागलं. मग मी ठरवलं, तुमच्याशी बोलायचं. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जग बघितलंय. तुमचा अनुभव कितीतरी जास्त आहे. तुमच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.”

“बोल तू. मी ऐकतेय.”आई हरभऱ्याच्या झाडावर चढल्या होत्या.

मग आरतीने पहिला मुद्दा घेतला.

“मी विचार करत होते की प्रमोशनचा विचार कॅन्सल करायचा. का? तर नंतर जबाबदारी वाढेल म्हणून. पण ती जबाबदारी अंगावर घ्यायची माझी   कुवत नाहीय का? ती कुवत माझ्यात नक्कीच आहे. शिक्षण, ज्ञान, आत्मविश्वास सगळ्या दृष्टींनी मी समर्थ आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? तर वेळ. म्हणजे प्रमोशननंतर मला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. पण जास्त म्हणजे किती जास्त? तर थोडासाच जास्त. शिवाय प्रमोशन घेतलं नाही, तर मला जास्त वेळ काम करावं लागणारच नाही, असं थोडंच आहे?… बरोबर आहे ना, मी म्हणतेय, ते?”

आईंना ‘हो ‘ म्हणावंच लागलं.

“प्रमोशन मी आता नाही घेत. आणखी पाच-सहा वर्षांनी पुन्हा सर्क्युलर निघेल, तेव्हा ट्राय करीन. तेव्हा जुई सहावी-सातवीत असेल. पिट्टूही दुसरी-तिसरीत असेल. म्हणजे दोघांचा वाढता अभ्यास, त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीज-सगळ्यांसाठी त्यांना माझी गरज लागणार. शिवाय तेव्हा माझी दोन वर्षांकरता ट्रान्सफर झाली तर त्यांचीही इथून तिथे, तिथून इथे शाळा बदला, ऍडमिशन्स, डोनेशन्स…. सगळेच प्रॉब्लेम्स वाढत जाणार. त्या दृष्टीने बघितलं तर आताच प्रमोशन घेणं श्रेयस्कर. तुम्हाला काय वाटतं?”

“तू म्हणतेयस त्यात तथ्य दिसतंय.”

“अर्थात इंटरव्ह्यू दिला म्हणजे प्रमोशन नक्की मिळेलच, असं नाहीय. त्यातही चार  शक्यता आहेत.”

“चाsर?”आईंनी विचारलं.

“हो, चार. म्हणजे ट्रान्सफरचं बाजूला ठेवलं तर. आता पहिली शक्यता म्हणजे मी आणि समर दोघांनाही प्रमोशन मिळेल. दुसरी शक्यता ही,की दोघांनाही मिळणार नाही. तिसऱ्या शक्यतेनुसार समर प्रमोट होईल, मी होणार नाही. इथपर्यंत काहीही झालं, तरी विशेष फरक पडणार नाही. प्रॉब्लेम आहे, तो चौथ्या  शक्यतेत. मला -प्रमोशन -मिळालं -आणि -समरला,-मिळालं -नाही -तर -”

“पार कोलमडून जाईल तो,”आई म्हणाल्या.

“मलाही तेच वाटलं, आई. त्यामुळेच माझं डोकं भणभणायला लागलं,”आरतीने हुकमाचा एक्का बाहेर काढला.

“मी विचार करायला लागले. समजा, असं झालंच, तर मी काय करीन? अर्थातच मी प्रमोशन नाकारीन. पण ऑफिसमध्ये मी हे कारण सांगू शकेन का -की माझा नवरा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला नाही, म्हणून मी हे प्रमोशन नाकारलं? मलाच ते कारण हास्यास्पद वाटलं.

दुसरं असं की, आम्ही दोघंही एकाच बँकेत आहोत, म्हणून हे प्रॉब्लेम्स आहेत. समजा, समरने पुढेमागे हा जॉब चेंज केला, तर हे कारणच राहणार नाही  आणि माझ्या हातातोंडाशी आलेला घास माझ्याच मूर्खपणामुळे सोडून मी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलेला असणार.”

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments