सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
आरती जरा थांबली. दोन घोट पाणी पिऊन तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“खरं तर हा माझा एकटीचाच प्रश्न नाहीय, आई. हा सगळ्या स्त्रीजातीचाच प्रश्न आहे. त्यात पुन्हा भारतीय कुटुंबपद्धती पुरुषप्रधान असल्यामुळे स्त्रीला नेहमीच नमतं घ्यावं लागलं आहे. बऱ्याच प्रांतातल्या बहुसंख्य उच्चवर्गीय स्त्रिया अगदी पुरुषांच्या बरोबरीने शिकतात. पण लग्नानंतर मात्र ‘आमच्यात बायकांनी नोकरी केलेली चालत नाही ‘असं अभिमानाने सांगत ‘चूल आणि मूल ‘करत बसतात. किती स्त्रीशक्ती वाया जातेय अशानं.”
“तू म्हणतेयस ना, आरती, ते मला पटतंय. तरीपण बायकोने नवऱ्याच्या पुढे जाणं हेही विचित्र वाटतं.”
“कारण लहानपणापासून आपल्या मनावर तसंच बिंबवलं गेलंय. नवरा बायकोपेक्षा उंच हवा,जास्त शिकलेला हवा, त्याचा पगार तिच्यापेक्षा जास्त हवा….”
“मग त्यात काय चूक आहे?”आईंनी विचारलं.
“चूक विचारधारणेची आहे, आई. पूर्वी अर्थार्जन पुरुषाने करायचं आणि स्त्रीने घर सांभाळायचं, अशी कामाची समान वाटणी होती. नंतर स्त्री नोकरी करायला लागली. सुरुवातीला तिला विरोध झालाच ना? विशेषतः नवऱ्याचा इगो आणि समाजाचंही ‘बायकोची कमाई खातो’ वगैरे वगैरे. हळूहळू स्त्रीचं नोकरी करणं समाजाच्या, विशेषतःमराठी समाजाच्या पचनी पडलं. आता तर ‘नोकरीवालीच बायको पाहिजे’ अशी अवस्था आलीय.हल्लीहल्ली नवऱ्यापेक्षा जास्त पगार असलेली बायको पत्करायचीही मानसिक तयारी झाली. इथपर्यंत ठीक होतं. कारण अर्थार्जन,म्हणजे पैसे मिळवणं, हाच स्त्रीच्या नोकरीचा एकमेव हेतू होता.”
“मग दुसरं काय असणार?” आईंना प्रश्न पडला.
“आता मुली शिकतात. अगदी पुरुषांच्या बरोबरीने एमबीए, डॉक्टर, इंजिनियर होतात. त्यांनाही पुरुषांसारखं स्वतःला प्रूव्ह करावंसं वाटणारच ना? त्यांच्याही कर्तबगारीचं चीज व्हायला हवं ना? हा सुरुवातीचा काळ असल्याने माझ्यासारखीला या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय. आणखी काही वर्षांनी या गोष्टी सगळ्यांच्याच अंगवळणी पडतील.”
तिने घड्याळाकडे बघितलं.
“बापरे! आई, किती वाजले बघा. मी आपली बडबडतच बसले. तुम्हाला त्रास व्हायचा उगीच जागरणाचा. चला. झोपायला जाऊया.”
दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, ती आशेचे किरण घेऊनच.
उठल्याउठल्याच आईंनी आरतीला सांगितलं, “हे बघ. रात्री बराच वेळ झोप येईना. तुझ्या बोलण्यावर नीट विचार केला. अगदी उलटसुलट विचार केला आणि तुझे सगळे मुद्दे पटले मला. तू जा इंटरव्ह्युला. समरला प्रमोशन मिळो, न मिळो.त्याच्याशी तुझ्या प्रमोशनचा संबंध नाही. तू आणि मी त्यालाही पटवून देऊया हे सगळं. दुसरं म्हणजे मुलांची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत. अगदी ट्रान्सफर झाली तरीही.”
आरती तृप्त झाली.. तिच्यातल्या स्त्रीशक्तीने घातलेली साद आईंची दाद मिळवून गेली होती.
समाप्त
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈