सौ. राधिका भांडारकर
☆ जीवनरंग ☆ दाखला – भाग – 2 ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
तानीबाईनं अलगद पिशवीतनं रेशनकार्ड काढलं. अन् त्याच्या हातात ठेवलं. आणि म्हटलं,
“दादा,मी निराधार हाय. तिथं पल्याड दूर माझं खोपटं हाय. हातपाय थकलंय्.! काम व्हत नाय.. सरकारनं कसली योजना काढली हाय म्हनावं… महिन्याच्या महिन्याला
सहाशे रुपये देतं म्हणे सरकार.,.”
तानीबाईला जेव्हढं माहीत होतं आणि जेव्हढं बोलता येत होतं तेव्हढं ती बोलली…
टेबला जवळच्या माणसानं मग विचारलं… “कां गं? मुलं नाहीत का? सांभाळत नाहीत का ती?”
“हायत कीपण ती लांब शहरात रहातात,…मला नाही भावत तिथे. मुलं विचारत नाहीत असं काही तानीबाईला सांगवेना…
मग टेबलाजवळच्या माणसानं, रेशनकार्ड ऊघडलं… शेजारी बसलेल्या माणसाला दाखवलं. मग त्या दोघांत काही बोलणं झालं.
तानीबाईचा ताण वाढत चालला. दडपण यायला लागलं.
“हुईल का आपलं काम?
मग तिनं विचारलं,
“काय व्हं! मिळतील ना मला पैकं?
टेबलाजवळच्या माणसानं, रेशन कार्ड पाहत पाहत म्हातारीला सांगितलं, “हे कार्ड नाही चालणार आजी, यांत तुझ्या मुलाचंही नाव आहे….मोतीराम..”
तानीबाईचा आँ च झाला.
मोतीराम? माझ्या मुलांची नांवं तर भरत आणि लक्षा आहे…
“मग हा मोतीराम कोण?”
“मोतीराम माझा कुत्रा व्हता. लई गुणी. त्यानंच मला आता पावेतो सोबत केली.प ण आता तो न्हाय्.तो गेला.मरला. अन् मी ऊरले.”
हे सांगताना आताही तानीबाईच्या डोळ्यातून पाणी गळलं.
“पण आजी त्याचं नांव इथून काढावं लागेल.आणि नवं कार्ड बनवावं लागेल.”
“मग काढा की….”
“तसं नाही आजी. सरकारी नियम असतात. कागदाला कागद लागतो.मोतीराम कुत्रा होता हे तुला सिद्ध करावं
लागेल.त्याच्या मृत्युचा दाखला आणावा लागेल….”
“कुत्र्याच्या मृत्युचा दाखला? तो कुठुन आणू? मी सांगते न दादा तुला, मोतीराम कुत्रा होता अन् तो मरला…..”
“..तसं नाही चालत आजी.या रेशनकार्डावर तुझं काम नाही होणार.तुला तुझ्या एकलीच्या नावावर नवीन कार्ड
बनवावं लागेल..आणि त्यासाठी मोतीरामच्या मृत्युचा दाखला लागेल…कागदाला कागद लागतो…”
तानीबाई नवलातच पडली.
“आत्ता गो बया..!!”
टेबला जवळच्या माणसांना ती पटवतच राहीली. प्रश्न विचारत राहिली. पण त्या माणसांना तानीबाईंच्या प्रश्नाला ऊत्तर देण्यात काडीचाही रस नव्हता…ए व्हाना रांगेतली
माणसंही कटकट करायला लागली होती. तानीबाई ऊगीचच वेळ खात होती, असेच वाटले सर्वांना..
क्रमश:..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈