सौ. राही पंढरीनाथ लिमये
☆ जीवन रंग ☆ बाळ वाट बघतय ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆
प्रिय वर्षा,
तुला काय म्हणू? धन्यवाद म्हणू की साष्टांग नमस्कार घालू? दोन्ही ही माझ्या दॄष्टीने कमी च आहेत. खरं सांगू आज मला धाराऊ आठवतेय संभाजी राजांची दुध आई. तु धाराऊ चा वारसा पुढे चालवलास.
दोन दिवसापासून मी माझ्या बाळाला बाटली ने दुध पाजायचा प्रयत्न करतेय. दुध पिताना बाळा ने खुप त्रास दिला. मला वाटलं मी दुध पाजतेय म्हणून त्रास देतोय. सासूबाई ना हाक मारली आणि मला सगळा उलगडा झाला.
माझी प्रेग्नन्सी पहिल्यापासूनच काॅप्लीकेटेड होती. बेडरेस्ट होती त्यात कोरोना चा महाराक्षस घाबरवत होता. लाॅक डाऊन सुरू झालं आणि सगळं कठीण होऊन बसलं. हाॅस्पिटलला तपासायला जाताना खुप ताण यायचा त्यात बाळाला काही होणार नाही ना ही भिती. त्यामुळे बी.पी. वाढायचं. सगळे सांगायचे मन शांत ठेव. पण कसं ठेवणार?
जगभर कोरोना शिवाय दुसरा विषय नाही. सतत वाढणारे मृत्यू चे आकडे. मदत करणारे डाॅक्टर, नर्स, पोलीस इतर कर्मचारी यांच्या मृत्यू च्या बातम्या ऐकल्या की मन सुन्न व्हायचं. देवा चा राग यायचा. कोरोना चा पेशंट एकटा असतो. जवळ नातेवाईक नसतात. हे सगळं भयानक वाटायचं. कसं मन शांत ठेवणार?
दिलेल्या तारखेला माझं सीझर झालं. बाळ व्यवस्थित होत पण मी कोमात गेले. मी शुद्धीवर येईपर्यंत तु जे केलंस ते मला सासूबाईंकडुन कळलं. बाळ बाटली ने दुध पीत नव्हतं. रडुन रडुन श्वास धरायला लागलं. त्याच वेळी तु तुझ्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन आली होतीस. तुझ्या बाळाला नर्स कडे दिलस आणि सासूबाई ना घेऊन डाॅक्टरांकडे गेलीस. तू त्याना विचारलस मी यांच्या बाळाला माझं दुध दिलं तर चालेल?” “चालेल पण सगळे स्वच्छतेचे नियम सांभाळून “.
“हो मॅडम मी पण नर्स आहे. मला जाणीव आहे त्याची.”
तु बाळाला जवळ घेऊन स्तनपान दिलंस. बाळ शांत झोपला. तिथुन पुढे रोज तु न चुकता माझ्या बाळाच्या दुधाची वेळ सांभाळत होतीस. तुझ्या दुधामुळे बाळाची तब्येत सुधारली. तुला पौष्टिक खाणं करणं जमणार नाही म्हणून सासूबाई नी तुला डिंक, अळीव लाडू करुन दिले. तुझ्या घरी दुधाचा रतीब लावला. तु नको म्हणु लागलीस पण त्या तुझी आई झाल्या आणि तुला प्रेमळ दम दिला.
तु माझ्या बाळाला जगवलस कुठलीही अपेक्षा न ठेवता. तुझं दुध माझ्या बाळासाठी अमृत झालं आणि तु माझ्यासाठी यशोदा. मी शुद्धीवर आल्यावर तु येणं बंद केलंस. असं करु नकोस. बाळाला तुझ्या दुधाची गरज आहे.
येताना तुझ्या बाळाला घेऊन ये. तु जशी माझ्या बाळाची दुधआई आहेस तशीच मी तुझ्या बाळाची दुसरी आई आहे. तो त्याच्या भावासारखाच वाढणार आहे. हा माझा निर्णय आहे.
कोरोना मुळे तुझ्या सारखी मोठ्या मनाची बहीण मिळाली हे माझं भाग्य. आपले मागच्या जन्मी चे काही तरी ऋणानुबंध आहेत. सासूबाईंबरोबर पत्र देतेय. त्यांच्या बरोबरच तुझ्या बाळाला घेऊन ये. माझं बाळ दुधासाठी तुझी वाट बघतय.
तुझीच ऋणी
निशा.
© सौ. राही पंढरीनाथ लिमये
मो नं 9860499623