सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – परदुःख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“एका विवाहित महिलेची,आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या….. नवऱ्याचे दुसऱ्या कोणा बाईशी अनैतिक संबंध हे या आत्महत्येचे कारण असल्याचे समजते “…….. सकाळी सकाळी वर्तमानपत्रात ही बातमी वाचल्यावाचल्या आभाची बडबड सुरु झाली……..
“वेडी होती ही बाई….. एक नंबरची मूर्ख होती…… जरासाही विचार केला नसावा तिने. एवढा एकच मार्ग उरला होता का तिच्याकडे…. सोडून द्यायचं होतं तिने असल्या नवऱ्याला. किंवा मग मुलांना घेऊन निघून जायचं कुठेतरी… नोकरी करायची…… सन्मानाने रहायचं….. मुलांना सांभाळायचं. एका दोषी माणसाला असा स्वतः मरुन शह दिला, आणि एक आई असूनही, स्वतःच्या मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या शक्यता तिने स्वतःच्या हाताने संपवून टाकल्या….. त्यांचं भविष्यच हिरावून घेतलं……..”
…….. “ तू तरी करू शकली होतीस का असं काही”?…….जेव्हा तुझा पंचेचाळीस वर्षांचा नवरा, त्याच्या ऑफिसमधल्या चोवीस वर्षांच्या दामिनीच्या प्रेमात पार गुरफटला होता तेव्हा ?’…..’येता जाता तुला ‘ म्हातारी – शिळी होत चालली आहेस तू’ असं म्हणत तो तुझा अपमान करत होता तेव्हा?’……’ती दामिनी नावाची आग स्वतःच्या आयुष्याला लागू नये म्हणून तू विझवू शकली होतीस का त्या आगीला?’…..’ तू तर शिकली – सवरलेली होतीस, सक्षम होतीस ना? मग तू का नाही केलास कुठे नोकरी करण्याचा विचार?’……’त्यावेळी हाआत्मसन्मानाचा धडा तुझ्या आयुष्याच्या अभ्यासक्रमासाठी का नाही निवडलास तू ?’ “…………
……. आभाच्या अंतर्मनात दुसऱ्याच क्षणी असे कितीतरी प्रश्न उभे ठाकले, आणि त्यांनी चारही बाजूंनी तिला जणू घेरून टाकलं ……. आणि एखाद्याला उपदेश करणं अगदी सोप्पं असतं, पण दुसऱ्याचं दुःख मनापासून समजून घेणं फार फार अवघड असतं, हे आता तिला कळलं होतं…..आणि मनापासून पटलंही होतं.. ….
मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈