श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 90 ☆
☆ कधी व्हायची सकाळ ☆
काळ्या ढगात झाली किरणे गहाळ सूर्या
तेजोवलये घेउन मिरवी टवाळ सूर्या
मराठीतुनी गीता सांगे ज्ञानेश्वर हा
जीवन ओवी व्हावी येथे मधाळ सूर्या
समजविण्याचे दिवसच नाही आता उरले
मध्यस्थाचे फुटले येथे कपाळ सूर्या
किती बेसुरे जीवन झाले कसे गाउ मी
सूरच झाले सारे आता रटाळ सूर्या
व्यवहाराचा किती वाढला टक्का आहे
वृद्ध पोसता होणारच ना अबाळ सूर्या
चिपाड होता काया माझी अशी फेकली
कधीतरी मी ऊसच होतो रसाळ सूर्या
रथ घोड्यांचा घेउन गेला सांग कुठे तू
कधी व्हायची सांग मला रे सकाळ सूर्या
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈