श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

“रिटायरमेंट तीन वर्षांवर आली. ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते’ अशी पदवी घेऊनच निव्रुत्त व्हायचं बघा. त्याचंबी लई फायदे असतात बरका. चाललीय खटपट.”

“खटपट?म्हणजे?”

“घ्या. तुम्हाला ठाऊक नाही?”

“म्हणजे  अर्ज करायचा, कागदपत्र सादर करायची हे माहितीय की.”

“तुम्ही नाही केला प्रयत्न?”

“नाही हो. हेडसरांची शिफारस लागते ना. ते देतील अशी खात्री नव्हती. कुठे नाकदुऱ्या काढायच्या! कधी वळलेच नाही तिकडे. विचारच नाही केला.”

“बाई, पुरस्कार मिळवायचा म्हणजे आधी सगळ्यांशी गोड रहावं लागतय्. पण आता जाऊदे मागचं. आता तर तुम्हीच हेड. कुणाची ‘ब्र’काढायची हिंमत न्हाई. मात्र तुम्हाला  संस्थेच्या सेक्रेटरींची नाही तर अध्यक्षांची शिफारस लागणार.”

“बापरे! म्हणजे आणखी अवघड.”

“तुमचा सही, शिक्का बगितला की लगेच सह्या ठोकतात. शिफारस क्लार्ककडून लिहून घ्या. त्यांना पाठ असते. आता सहा म्हयन्यांत ग्रँट सुटेल. चेक घेऊनच सेक्रेटरींकडे जावा. मग आनंदात गप सह्या ठोकत्यात.”

“कागदपत्रं म्हणजे आपण शाळेसाठी, मुलांसाठी काय काय केलं कोणते उपक्रम राबवले वगैरे ना?” मी विचारलं. मला तेव्हढच माहिती ना!

“ते मात्र इतकं सोपं न्हाई बरका मँडम. इतक्या थोड्या वेळात ते कसं सांगणार?

तुम्ही असं करताय का? आमच्या घरीच या एकदा. माझी कागदं तुम्हाला समक्षच दाखवतो. तुम्ही पहिल्याने जिल्हा पुरस्कारासाठी प्रयत्न करा. मग एकेक पायरी चढायची. रिटायर्ड व्हायला सहा सात वर्ष आहेत ना? तेव्हढ्यात सगळं उरकावंप लागेल. आत्ता पासून कामाला लागा.”

ढेकळे सर निरागसपणे म्हणाले. तेच मला गमतीशीर वाटत होत. पुरस्कारासाठी आपण प्रयत्न केले हे निःसंकोचपणे सांगत होते. उगीच आपलं मला माहीतच नव्हतं असा मानभावीपणा नव्हता.

आणि खोटं कशाला बोलू, माझ्याही मनात पुरस्कार चकचकायला लागला होता. अरे, आजपर्यंतच्या नोकरीत मी मुलांसाठी काय काय केलं होतं. रिझल्ट साठी कष्ट घेतले, गरीब, कच्च्या, अपंग मुलांसाठी झटले, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलांचे कार्यक्रम केले, बालसाहित्य लिहिलं, नाटकं बसवली, त्यातून शाळेसाठी निधी जमवला, एव्हढं काम केल्यावर कमीतकमी जिल्हा पुरस्कार मिळायला हरकत नव्हती ना? आता मुख्याध्यापक म्हणून आणखी काम, मग राज्यपुरस्कार. निव्रुत्तीपर्यंत एव्हढे सोपान चढता येतील. शिक्षकांच्या जीवनात पुरस्कार म्हणजे मानाचं पान. हवेत तरंगल्यासारखं झालं. ढेकळे सरांकडे जाऊन कागदपत्र बघण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. एक दिवस निवांतपणे गेलेच त्यांच्या घरी.

“या, या,”म्हणून सर्वांनी माझं स्वागत केलं. एक शहरातल्या बाई आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येतात ह्याचं सरांना अप्रूप वाटत होतं. ‘पुरस्कारासाठी प्रयत्न’ यातला विनोद, खोच, खंत  असं त्यांच्या निष्पाप स्वार्थी मनाला काही वाटत नव्हतं.

शाळेच्या डोक्यावरच त्यांचा बंगला म्हणजे बंगल्याच्या तळघरातच शाळा. गेल्यावर बाल्कनी कम् शाळेचं ऑफीस. सर म्हणाले, “हे माझे सासरे कम् संस्थेचे अध्यक्ष आणि ह्या संस्थेच्या कार्यवाह कम् माझ्या सुविद्य पत्नी.”

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments