श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी   क्रमश: भाग 1 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

दोस्तांनो, आणि दोस्तीणींनो तुम्हीसुद्धा… अलीकडे आपल्या शारदारमणांकडे जाऊन आलात की नाही? नसाल तर एक चक्कर टाका आणि त्यांच्या 50,000 च्या सेटीवर बसून या. कोण शारदारमण? कमाल करताय बुवा तुम्ही? आपले तेच हो… गिनीज बुकात जास्तीत जास्त कविता लिहिणारी व्यक्ती म्हणून नाव छापून येण्यासाठी जंग जंग पछाडणारे आणि अखेर जास्तीत जास्त शब्द लिहिण्यासाठी का होईना, पण गिनीज बुकात नाव नोंदलं गेलं म्हणून खूश होणारे शारदारमण! तर त्यांच्या नऊ बाय आठच्या दिवाणखान्यात आता पन्नास हजाराची सेटी ठेवलीय. एकदा तरी या सेटीवर बसून धन्य होऊन या.

आता पन्नास हजाराची सेटीया एवढ्याशा जागेत काशी आली? तर ती करामत शारदारमणांच्या रमणीची. तो किस्सा त्यांच्याकडूनच ऐकायला हवा.  त्याचं काय झालं की शारंचं (शारदारमणांचं) नाव गिनीज बुकात आलं, तरी बुजुर्ग कवींनी त्याला धूप घातली नाही. त्यांचा म्हणणं असं की शारंच्या कविता या कविताचं नाहीत. म्हणून तर त्यांची नोंद गिनीज बुकात कवी म्हणून न होता, जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून झाली. तेव्हा गिनीज बुकात नाव आलं म्हणून त्यांना एवढं महत्व द्यायचं कारण नाही.’

आमच्या गावात एक प्रतिभा मंडळ आहे. त्यातल्या  नव्या अंकुरांना फारसं कुठे इकडे तिकडे लवलावायची संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी ‘नवांकुर प्रतिभा मंडळ’ नावाचा सावता सुभा मांडला. हे मंडळ नवोदित कवींचे असले, आणि शारंच्या १०, ००० हून जास्त कविता लिहून झालेल्या असल्या, तरी मंडळातील नवोदित कवींनी मोठ्या आदराने मंडळाचे अध्यक्षपद शारंना दिले. मुले म्हणाली, ‘आमच्या पोरा-टोरात कुणी अनुभवी नको का?’ लवलवत्या नवांकुरांनी शारंना हरभर्‍याच्या झाडावर चढवले आणि शार चढले. ५०० रुपये संस्थेचे आजीव सभासद म्हणून आणि ५०० रुपये अध्यक्ष झाले, इस खुशीमें मंडळाला देणगी म्हणून, मुलांनी त्यांच्याकडून वसूल केले. याशिवाय मंडळाच्या नावांकूरांना त्यांनी खुशीने चहा-वडा दिला, ते वेगळेच.

एक दिवस शरद नामे नवांकुराने म्हंटले, ‘शारदारमणजी, कविता संग्रह निघाला पाहिजे तुमचा. त्याशिवाय काही खरं नाही. संग्रह असल्याशिवाय या क्षेत्रात प्रतिष्ठा नाही.’

‘तुमच्याइतक्या कविता असत्या, तर आम्ही ५० कविता संग्रह काढले असते एव्हाना…’ दूसरा अंकुर उद्गारला.

‘ते खरय. पण कविता संग्रह काढणार कोण?’ कवी शारं उर्फ आरोळे सदाशिव शंकर  उसासत म्हणाले. आज-काल प्रस्थापित, प्रथितयश वगैरे… वगैरे… कवींच्या कविताही प्रकाशक लोक हातात धरत नाहीत.’

‘ते तुम्ही आमच्यावर सोडा हो…’ बाळा चौगुले खास कानडी ढंगात म्हणाला.

‘म्हणजे माझी काही खास मानधनाची अपेक्षा नाही.’ इति  शारं.

’का नाही? मी म्हणतो का नाही? एका कवितेला कमीत कमी ५०-१०० रु. तरी मिळायलाच पाहिजेत.’

‘हो ना! जास्तीत जास्त शब्द लिहिल्याबद्दल का होईना, गिनीज बुकात नाव आलंय तुमचं. म्हणजे तुम्ही तसे जागतिक कीर्तीचे…’

‘कसचं कसचं..’ म्हणत, शारंनी हंनुमांप्रसादमध्ये चहा – वडा सांगायला एका अंकुराला पाठवलं.

‘कशाला… कशाला… म्हणत चहा – वडा सांगायला गेलेल्या अंकुराने चक्क किलोभर जिलबीही सांगितली, तोंड गोड करायला म्हणून.

शरद साजणे म्हणाला माझा मावस आतभाऊ मेहतांच्या वर्तुळातला आहे. त्याच्याकडे कविता संग्रह देऊ या. ‘

‘पण मेहता कोण?’

‘सध्या माराठीतले अग्रगण्य प्रकाशक…’

‘अच्छा ते होय? म्हणजे पुण्यातले?’ शारंच्या विचारांची झेप  मेहता प्रकाशनपर्यंत कुठली जायला.

‘मी स्वत: जाऊन प्रेस कॉपी त्यांच्याकडे देऊन येतो.

‘किंवा आपण हा संग्रह मौजेकडे देऊयात. ही भागवत मंडळी आमच्या अगदी घरोब्यातली आहेत…. फॅमिली रिलेशन्स… ’ गोटू गटणे आपले आणि आपल्या घरच्यांचे मोठमोठ्या लोकांशी किती घरगुती संबंध म्हणजे फॅमिली रिलेशन्स आहेत, हे सांगायची एकही संधी सोडत नाही.

त्यापेक्षा ‘साकेत’शी कॉँटॅक्ट करूयात. ‘साकेत’ नवोदितांचे काव्यसंग्रह काढतात म्हणे. म्हणजे आपले शारं काही नवोदित नाहीत, पण त्यांचा अजून एकही काव्यसंग्रह निघाला नाही ना, म्हणून म्हणायचं!’

जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली.

क्रमशः ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments