श्री मुबारक उमराणी
☆ कवितेचा उत्सव ☆ आभाळ भरता! ☆ श्री मुबारक उमराणी ☆
दुःख आभाळ भरता
श्वासी गडगडे मेघ
हुंदक्यात अश्रूधार
कडाडते वीज रेघ
डोळा डोंगर कपारी
अश्रूधार बरसते
गंगा यमुना नयनी
प्रेमभेटी तरसते
प्रेमे आशिष मिळता
बाष्प स्पर्शे सूर्य तनी
पाठीवरी हळुवार
हस्तस्पर्श, हर्ष मनी
अश्रूथेंब क्षारयुक्त
समुद्रही फिका पडे
तन भुमी रे शिंपता
भिजे ह्दयीचे कडे
सुख समाधान पिक
कोंब अंकुरेल मनी
जिद्द, उत्साह कणीस
भरे रोमरोमी कणी
पंख पाखरु फिनिक्स
झेप पतंगी रे दंग
इंद्रधनु नसनसी
सुखरंगी सप्तरंग
मनमोर थयथय
नाचे आनंदे क्षितीजी
प्रेमवारा गारस्पर्श
कडाडते मन विजी
शब्द सळसळे पाणी
हर्ष जलदा शिपिंता
झरझरे ते मोदाश्रू
तृष्णा लोपते रे पिता
जन्मी दुःखाश्रू सुखाश्रू
नेत्री मेघालयी खुले
सुखदुःख हले झुला
शंकरपार्वती झुले
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈