श्री अरविंद लिमये
☆ विविधा ☆बंधन आणि बांधिलकी ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘बंदिस्त’मधला ‘बंद’ कांहीतरी हिरावून घेतलं गेल्याचं ध्वनित करतो. त्यामुळे बंदिस्त म्हणजे एकप्रकारचं बंधन, मर्यादा, निर्बंधित असंच ठळकपणे मनावर कोरलं गेलंय. पण बंदिस्त या शब्दात सकारात्मकता ही मुरलेली आहेच. बंदिस्त म्हणजे संयमित, नियमित, प्रमाणबद्ध सुरक्षित,सुव्यवस्थित असंही सगळं असू शकतं. पण या सगळ्या अर्थशब्दातली शिस्त, व्यवस्थितपणा हे सगळं बंदिस्तच्या नकारात्मक अर्थाच्या गडद सावल्यांमुळे कांहीसं दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं.
एखाद्या कथेची,संरचना (प्लॉट कन्स्ट्रक्शन) अतिशय व्यवस्थित, प्रमाणबद्ध,पकड घेणारी अशी जमून आली तर ती कथा खूप छान, बंदिस्त आणि त्यामुळे परिणामकारक आहे असं म्हंटलं जातं. हे जसं कथेबाबतीत तसंच एकांकिका, नाटक यांनाही आवश्यक असतंच. एकांकिका, नाटक याची संहिता पाल्हाळीक, पसरट असेल तर ती पकड घेऊ शकत नाही.ती बंदिस्त असणे त्या संहितेची गुणात्मकता वाढवण्यासाठी आवश्यकच असते.
चार भिंती आणि छपरामुळे घरालाही एक प्रकारचा बंदिस्तपणा येतोच. तोही आवश्यक असाच. या बंदिस्तपणातच त्या घराची आवश्यक सुरक्षाच नाही फक्त तर घरपणही आकाराला येते.
हे चार भिंतीतलं घरपण बंधनासारखं जाचक नसतं तर ते स्वखुशीने आणि मनापासून स्वीकारलेल्या बांधीलकीसारखं समाधान देणार असतं.
या घरपणातही सगळेजणच जर बांधिलकी मानणारे असतील तर त्या घरातलं सहजीवन आनंददायी, निरामय असतं. पण ही बांधिलकी जर एकतर्फीच असेल तर त्यात गृहित धरणं येतंच. आणि त्यामुळे निर्माण होणारी अपरिहार्य घुसमट घरपण विरुन जाचक बंधनांसारखी वाटू लागते.
म्हणूनच घरपण जपायचं तर तिथे एखाद्याला गृहित धरणं नसावं. देवाणघेवाण असावी. परस्परांना समजून घेणं असावं.
असं असणाऱ्या किंवा नसणाऱ्याही प्रत्येक घराला त्या त्या घराची अशी एक गोष्ट असते.त्या गोष्टींतली पात्रे, प्रसंग वेगवेगळी असली तरी आशय एकच असतो. हा आशय बंधनांचं, बंदिस्तपणाचं महत्त्व सांगणारा जसा, तसाच कधीकधी त्याच्या अभावामुळे येणारं एकारलेपण, घुसमट अधोरेखित करणाराही असतो. बंधनांचं रुपांतर बांधिलकीत होण्याची गरज घुसमट निर्माण होण्यापूर्वीच जाणवणं हे महत्त्वाचं..!
© श्री अरविंद लिमये
सांगली
९७२३७३८२८८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈