सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ कवितेचा उत्सव ☆ क्षण—- ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

व्यस्त व्यग्र दिवसातले

मोजकेच, मोहक पण

निसटते क्षण ..

भेटतात मला न चुकता

चोरुन भेटणाऱ्या

प्रेयसीसारखे ||

आसाभोवती फिरणाऱ्या

चाकासारखं

आयुष्याला जखडून फिरतांना

मनाची झीज थोपवायला

धावून येतात हे क्षण —

वंगण असल्यासारखे ||

चहूबाजूंनी मनावर कोसळू

पहाणारा

आघातांचा बेभान पाऊस

निश्चलतेच्या गोवर्धनावर

थोपविण्यासाठी ..

पुरतात हे क्षण

कृष्णाच्या करंगळीसारखे||

उदास निराश काळोखात

अंदाजानेच चाचपडतांना

हळूच वाट दाखवतात हे

आशेचे प्रकाशकण होऊन

काजव्यांसारखे ||

नकळत पहाते वाट मी

या संजीवक अनमोल क्षणांची

जेव्हा उरते फक्त मीपणच

माझे ..

वादळवाऱ्यात, एकाट-देवळात

मिणमिणत राहिलेल्या

पणतीसारखे || ……..

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुलभा जोशी

अप्रतिम