सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ माझा वाटेवरचा प्रवास… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

प्रत्येकाचं प्रवासाचं डेस्टिनेशन निराळं असत. व्यक्तिपरत्वे ते बदलतं. गड- किल्ल्यापासून ते परदेशगमनापर्यंत…. प्रत्येकाच्या वाटा निराळ्या,प्रत्येकाचे पहाड वेगळे,दगड वेगळे!

जन्माला आल्यापासून आपला प्रवास सुरू होतो, तो आपल्या निर्वाणा पर्यंत अविरत चालू असतो. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर प्रत्येकाचे वेगवेगळं! सुरुवातीचा बिंदू ठळक…. तिथी, वार, पळ, घटका दाखवणारा स्पष्ट असा!! दुसरा बिंदू धूसर अस्पष्ट अनाकलनीय तरीही निश्चित म्हणावा असा!!!

जगात येताना आपण एकटे येतो.जातानाही एकटेच जातो. ‘In between’ आपल्याला मॅनेज करावं लागतं. Adjust करावं लागतं. यासाठी सगे सोयरे मित्र-मैत्रिणी, आणि थोरा मोठ्यांचे हात हातात माळावे लागतात आणि प्रवास सुखकर सुरम्य करावा लागतो.

अहो! मी हे काय बोलते आहे तुमच्याशी? मी तुम्हाला माझ्या एका सुंदर प्रवासवर्णनाविषयी सांगणार होते ना? वाट चुकले कि काय ?….

आहेच ही वाट थोडी वळणावळणाची पण डेस्टिनेशनला म्हणजेच, त्या दुसऱ्या बिंदूपर्यंत नक्की पोचवणारी…

या वाटेने प्रवासात मला खूप काही दिले. नागमोडी, वळणा वळणाची खडतर, धुळीची, ओबडधोबड, जन्म आणि मृत्यू हे दोन बिंदू परस्पर जोडणारी ही वाट!! या वाटेवरचा हा मजेशीर प्रवास!!!

प्रवासावर निघायच्या आधीची तयारी आठवत नाही.निघाल्यापासूनच धूसर आठवतयं. किंबहुना सगळ्या नातेवाईकांनी माझ्या जन्माची चित्रफीत माझ्या मनावर बिंबवली आहे.

आईच्या उबदार कुशीतून सुरू झालेला हा सुरुवातीचा प्रवास आईच्या दुधासारखा गोड आणि दुधावरच्या सायी सारखा अलवार…..

आईला ‘आईपण’ देऊन मी तिचे आभार मानले. नैसर्गिक आनंदाचा क्षण बहाल केल्याने आई सुद्धा झोकात होती, असं बाबा म्हणतात. बाबांच्या मोठ्या हातात माझं इवलसं बोट होतं.

चाल चाल मोते,पायमोडी काटे

पायाच्या वाटेनं, हम्मा भेटे.

असे म्हणून आईने मला सावकाश मांडीवरून खाली उतरवलं.संभाव्य अडचणींची जणू कल्पना दिली. त्याचबरोबर ‘हम्मा’ भेटेल असं आमिषही दाखवलं.

हळूहळू दोघांनी मला स्वावलम्बन शिकवलं. आईच्या मांडीवर उतरून मी माझी वाट धरली.

बाबांनी बोट सोडलं पण आधार नाही! माझ्या हातात पांगुळगाडा होता आणि पायात छुम छुम! मी हॉर्न देत स्वतःला सांभाळत वाटेतल्या अनावश्यक गोष्टी दूर सारत मार्गाक्रमण करु लागले. आई-बाबांचं पडलं सवरलं तर सावरणं होतच…..

माझ्या या प्रवासातील वाटेवर इंद्रधनुष्य सांडलं होतं. या रंगीबेरंगी प्रवासात मला माझ्या प्रियजनांची भाषा समजू लागली. तसेच पशुपक्षांची भाषाही मला अवगत झाली. काऊ, चिऊ, माऊ, भू भू माझे मित्र झाले. अंगणातील जाई जुई, चाफा, गुलाब सगळे माझे गणगोत झाले. निसर्गही माझ्याशी बोलू लागला. निंबोणीच्या झाडामागे चांदोमामा लपायचा. लपाछपी खेळता खेळता पापण्या अलगद मिटायच्या.

आत्मचिंतन,आत्मपरीक्षण करत, प्रवासातले स्पीड ब्रेकर संभाळत माझी पावले चालत होती.माझी वाट ही माझ्याबरोबर वयात येत होती.माझ्या प्रवासातील गोडी वाढत होती.

बालपण,तारुण्य,वार्धक्य असा निसर्गाने दादरा ताल पकडला होता.त्यानेच मला ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’ असे भावगीत गुणगुणायला लावले आणि मी स्वप्नातला राजकुमार शोधू लागले.

संततीच्या रूपाने तारुण्य बालपण पुन्हा अनुभवलं. संसारात पडल्यावर ‘वाटेवर काटे वेचीत चाललो’ असे कधी कधी जबाबदार्‍याना कंटाळून म्हणावेसे वाटले. हा प्रवास अकल्पित वळणांचा, फसव्या नागमोडीचा, अनिश्चिततेच्या लयीचाअसा होता. कधी चढ तर कधी उतार….. या प्रवासात बऱ्याच वेळा ठेचकाळले पडले. माझ्या सावलीने मात्र माझी साथ कधीच सोडली नाही.

या प्रवासात मला खूप काही गवसलं. या वाटेनं मला खूप काही दिलं. हाताची ओंजळ करून मी चालले पण ती पुरेना… मग झोळी धरली….ती भरून ओसंडून वाहू लागली.वाईट गोष्टींसोबत काही चांगल्या गोष्टी सांडून गेल्या.’ओल्या बरोबर सुके जळते’म्हणतात ना! तसं काहीतरी….

या प्रवासाच्या वाटेवर सद्भावनांच्या कमानी दुतर्फा उभारल्या गेल्या.विचारांनी रांगोळी काढली.मैत्रीचं अत्तर शिंपलं गेलं.गप्पांच्या तुतार्‍या वाजल्या. गुरुजनांची सावली मिळाली. या सर्वांची उतराई व्हावे म्हणून सर्वांना काही देण्याऐवजी मी त्यांच्याकडूनच मागत सुटले. ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ असं काहीसं झालं माझं!

कोरी पानं घेऊन जन्माला आलेली मी; प्रत्येक पानागणिक विचारांचा एक प्राजक्त फुलवायचा आणि सुगंधाची लयलूट करायचा प्रयत्न करू लागले.

या प्रवासातील माझ्याबरोबर मोठे झालेले वृक्ष माझ्या सुखदुःखाचे साक्षीदार!! त्यांनादेखील कित्येक वेळा मी बहरताना आणि पानझडी होताना ‘याची देही याची डोळा’ पाहिलेलं आहे. मूळ घट्ट मातीत रुजवायचं त्यांनीच मला शिकवलं. वडाने पारंब्यांवर हिंदोळे घेताना मैत्रीचा संदेश दिला.’सुखदुःखे समेकृत्वा’ असे म्हणून मी वाटचाल करू लागले.

या प्रवासात काही शॉर्टकट्स आणि काही चोरवाटा सापडल्या.काही गोष्टी मोहमयी होत्या. त्यांनी मला अडवले पण मी त्यांच्या कचाट्यातून सुटून पुढे चालू लागले.

या वाटेवरच्या प्रवासात मी सारं जग बघितलं….. नव्हे डोळ्यात साठवलं पण मी हरवले नाही.माझी वाट पुन्हा माझ्या माऊली कडे घेऊन आली.

या प्रवासातील काही ठिकाणं मला खूप आवडली. त्या ठिकाणी माघारी जायची वाट मात्र सापडली नाही. त्यामुळे प्रवासातील त्या आवडलेल्या ठिकाणांना पुन्हा भेट देता आली नाही.

रियाज करावा तसं मी पुन्हा पुन्हा ते क्षण मात्र आठवू लागले आणि आनंद लुटू लागले. संपूर्ण प्रवास भर अर्जुनासारखी संभ्रमावस्था होतीच! भावनाप्रधान, संवेदनशील अशा व्यक्ती भेटत गेल्या आणि त्यांनी ह्या अवस्थेतून मला बाहेर खेचून काढले.माझ्या वाटेवर संस्काराचे गालिचे घातले. तारतम्यानं वागायला शिकवलं.

या वाटेवरच्या प्रवासात मला खजिना सापडला. त्या खजिन्यातील हिरे,माणके, रत्ने, जड जवाहिरे मी अंगावर लेऊन बसले.सदिच्छा,शाब्बासकी,प्रेम, सद्भावना,सन्मान,आशीर्वाद,अनुभव, पारितोषिक, प्रशस्तीपत्रक, सुवर्णपदक,संवेदना,ज्ञान, भक्ती…… बापरे बाप….’ देता किती घेशील दो    कराने ‘अशी माझी अवस्था झाली.

आयुष्यभर पुरेल इतकं बोधामृत या प्रवासाने मला दिलं.पुरेल इतकं शहाणपण, चतुराई, ज्ञान सगळं सगळं… साठ वर्षापासूनची ही पायाखालची वाट आणि त्यावरचा माझा हा अविरत चालणारा प्रवास!

या प्रवासाने मला समृद्ध केलं. सुखाचा शोध घेता घेता दुःख आडवी आली. दुःखाची झालर असल्याशिवाय सुख उठून दिसत नाही ना? पुढे…’वाट इथे स्वप्नातील संपली जणू’ म्हणून परतीचा प्रवास सुरू झाल्याची शंकाही मनाला भेडसावू लागली आहे.

आकाशातील नक्षत्र पाहता-पाहता नभाची खोली, उंची,भव्यता नजरेत साठवत गेले.आता उंच-उंच जायचंय तिथून खाली बघायचयं आणि मग माझ्या या प्रवासासाठी मी ज्या वाटेवरून चालले त्या वाटेचा उगम पाहून म्हणायचंय, ‘हे तर नक्षत्रांचं देणं!’

माझा जीवन प्रवास म्हणजे माझं आनंद निधान!! तो आनंददायी आणि अनुभव समृद्ध व्हावा हा प्रयत्न करणारे माझे सर्व हितचिंतक माझ्या वाटेवर दीपस्तंभासारखे उभे राहिले. त्यांची मी कशी उतराई होऊ?

आयुष्यभर कितीही मिळवलं,कितीही मिळालं तरी जाताना ते सगळं इथेच सोडून जायचं असतं हा अलिखित करार आहे.

तद्वतच सगळं इथंच सोडून ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असं म्हणून देवाघरची वाट शोधायची आणि एका वेगळ्या प्रवासाला निघायची ही नांदी तर नाही ना?……

 

माझी वाट माझा प्रवास

तिचा माझा सतत सहवास

 

एकटीचीच ही माझी वाट

काय वर्णावा तिचा थाट?

 

वळणावळणाचा तिचा प्रवास

त्यात नात्यांना जागा खास

 

मिळता मला त्यांचा सहवास

प्राजक्त फुलला दरवळून वास

 

मोठ्यांचा आशीर्वाद हा श्वास

बाकी सगळे आभासी आभास

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments