श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 94 ☆
☆ उल्हासित व्हा ☆
हातमाग हा विणतो आहे धागा धागा
उभ्या आडव्या धाग्याने मग बनतो तागा
नात्याच्या ह्या वस्त्राचेही असेच असते
सूत आडवे उभ्या सुताच्या कुशीत घुसते
सूत वागते तसेच आपण सारे वागा
हृदयामधल्या बागेमधली फुले सुंगधी
उल्हासित व्हा प्रत्येकाला आहे संधी
मुठीएवढ्या हृदयी आहे प्रचंड जागा
ग्रीष्म ऋतूचे कामच आहे दाहकतेचे
होइल सिंचन धरतीवरती मग प्रेमाचे
जाइल हिरवा चारा देउन बुजविल भेगा
आयुष्याच्या वाटेवरती दुःख तोकडे
सुई एवढया दुःखाचेही तुम्हा वाकडे
किती राउळी धनवंतांच्या मोठ्या रांगा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈