सुश्री प्रभा सोनवणे
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 94☆
☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆
आम्ही कुलिनांच्या कन्या
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात अखिल भारतीय महिला दिनाच्या निमित्ताने साहित्यदीप संस्थेचं कवयित्री संमेलन होतं, सूत्रसंचालन कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी करत होती.. मृणालिनी प्रत्येक कवयित्री ची ओळख करून देताना ज्येष्ठ कवयित्रींच्या कवितेतील ओळींचा आधार घेऊन त्या कवयित्रीच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत होती.
मृणालिनीची निवेदनाची ही पद्धत खुपच छान होती, ती कवितेविषयी न बोलता कवयित्री विषयी बोलत होती…..माझ्या विषयी बोलताना ती म्हणाली, प्रभा ताईंना पाहून मला पद्मा गोळेंच्या ओळी आठवतात, “आम्ही कुलिनांच्या कन्या, चाफेकळ्या पानाआड…….”
मी सुखावले आणि आयुष्याचं सिंहावलोकन करू लागले….
माझा जन्म सधन शेतकरी-बागाईतदार कुटुंबातला शहाण्णव कुळी मराठा घराणं, आजोबांची पंचक्रोशीत पत प्रतिष्ठा होती. वडील वर्षानुवर्षे गावचे पोलिस पाटील होते. खरंतर आम्ही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या वडनेर या गावचे वतनदार पण आजोबांची बहिण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या पिंपरी -वाघाळे या गावातील सरदार पवार यांची पत्नी, सरदार पवार देवास(म.प्र.) येथे वास्तव्य करून होते पण पतिनिधनानंतर आजोबांची बहिण (आम्ही त्यांना मासाहेब म्हणत असू.) त्या त्यांच्या वतनाच्या जमीनी असलेल्या वाघाळे -पिंपरी या गावात आल्या, पवारांचे मामा म्हणून सगळे गाव आजोबांना मामा म्हणत असे. बहिणीच्या गावला आजोबांनी आपली कर्मभूमी मानली, तिथे स्वकष्टाने शेकडो एकर जमीन खरेदी करून तिथे फळांच्या बागा लावल्या. माझा जन्म झाला तो काळ खुप वैभवशाली, ऐश्वर्यसंपन्न काळ होता. आजोबांच्या तीन बहिणी देवास, बडोदा, सूरत येथे राजघराण्यातल्या सूना , माझ्या दोन आत्याही देवास व बडोदा येथील संस्थानिकांच्या घरातच नांदत होत्या.
जमीन जुमला, गाई म्हशी, घोडे, मोठा दगडीवाडा, नोकर चाकर अशा सरंजामशाही वातावरणातला माझा जन्म !त्या गावातला आमचा रूबाब काही वेगळाच होता….पण ते एक लहान खेडेगाव असल्यामुळे चौथी पर्यंतच शाळा होती म्हणून आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी माझी आई माझ्या माँटेसरी पासून पुण्यात आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन बि-हाड करून राहिली होती.
आम्ही सुट्टीत गावाकडे जात असू, आमच्या वाड्याच्या शेजारी एक गुजराती कुटुंब रहात होतं, त्यांचं किराणा मालाचं छोटसं दुकान होतं, त्या कुटुंबातल्या चंपा आणि शांतू या मुली वयाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या पण मी त्यांच्या घरी जात असे आणि त्या हंड्यावर हंडे घेऊन पाणी आणायला विहिरीवर जात त्याचं मला खुप कौतुक वाटत असे. त्या ओढ्यावर कपडे धुवायला चालल्या की मीही त्यांच्या बरोबर ओढ्यावर जाऊन पाण्यात खेळत असे, एकदा चंपा, शांतू बरोबर ओढ्यावर गेले असताना आमची मोलकरीण कमल मला बोलवायला आली, घरी आल्यावर आजीने समज दिली, “त्या चंपा शांतू बरोबर जात जाऊ नको, गावातले लोक नावं ठेवतील, मोठ्या घरची पोरगी ओढ्यावर हिंडती!”
मृणालिनी कानिटकर म्हटल्या प्रमाणेच, मी जन्माने कुलिनांच्या घरातली कन्या होते हे नक्की!
…….त्याचे फायदे तोटेही अनुभवले
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
छान, पुढच्या भागाची उत्सुकता!?
धन्यवाद अरूणजी
पुढच्या बुधवारी पुढचा भाग