श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆ 

पुस्तकाचे नाव           : अंतर्बोल (कथा संग्रह) 

लेखिका                    :  सौ. राधिका भांडारकर

प्रकाशक                   : यशोदीप पब्लिकेशंस

पृष्ठ संख्या                  : 162 

मूल्य                         :  रु 200

ऑनलाइन उपलब्ध ->> अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर यांचा ‘अंतर्बोल ‘ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. हा त्यांचा चौथा कथासंग्रह. त्यांचे साहित्य ई अंकातून वाचले होते. त्यामुळे हा कथासंग्रह वाचण्याची उत्सुकता होतीच.

हा कथासंग्रह वाचून झाल्यावर एक वाचक म्हणून तो कसा वाटला हे सांगण्याचा हा प्रयत्न. हे  फक्त सामान्य वाचकाचे मत आहे.

‘अंतर्बोल’ या कथा संग्रहात एकंदर तेरा कथा आहेत. प्रत्येक कथा साधारणपणे अकरा पानांची आहे. त्यामुळे या कथा अगदी लघु ही नाहीत . कथा वाचल्यानंतर लक्षात येते की कथेतील पात्रे, प्रसंग व्यवस्थित रंगवण्यिसाठी एवढा आकार आवश्यकच आहे. दुसरे म्हणजे बहुतेक सर्व कथा मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग यावर आधारित  अशाच आहेत. म्हणजे लेखिकेने जे विश्व  अनुभवले आहे किंवा जवळून पाहिले आहे, त्यातून जे  भावबंध मनात निर्माण झाले, ते ‘अंतर्बोल’ च्या निमित्ताने वाचकांसमोर उलगडून दाखवले आहे. त्यामुळे लेखनात कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही. जे घडले, जे दिसले, जे जाणवले ते साध्या  सोप्या शब्दात व्यक्त केले;असे या कथांचे स्वरूप आहे. त्यामुळे कथांमधील पात्रे, प्रसंग हे आपल्या आजूबाजूचेच वाटतात.

आता जरा कथांकडे वळूया.

‘त्यांचं चुकलं’ ही या संग्रहातील पहिली कथा. जीवनसाथी शिवाय एकाकी पडलेल्या केसकरांची मानसिक अवस्था या कथेत मांडली आहे. घरातील संवाद तुटत चालला आहे. दोन पिढ्यांत वैचारिक व मानसिक अंतरही वाढत चालले आहे. घरात सुख आहे पण फक्त  दिखावू !त्यामुळे एकाकीपणा वाढतो आहे. काळाबरोबर न राहण्याचे परिणमही भोगावे लागताहेत. मृत्यू हाच सर्वात जवळचा मित्र वाटतो. अशी ही शोकांतिका!

‘आराखडा’ ही दुसरी कथा. या कथेतील नायकाने आपल्या आयुष्याचे नियोजन केले आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ते यशस्वी होते ही. पण नंतर मात्र त्याच्या या आराखड्यावर ओरखडे उमटू लागतात. नवी पिढी,  नवी  जीवनपद्धती, नवे विचार यामुळे केलेले नियोजन बिघडून जाते. आपण कुटुंबात असून एकाकी पडलोत असे वाटू लागते. पण पत्नाची खंबीर साथ असल्यामुळे संध्याछाया सुद्धा ‘  सुखविती हृदया’ याचा प्रत्यय येतो. या कथेचा शेवट व विशेषतः शेवटच्या चार ओळी वाचकालाही  सुखावून जातात.

‘डाॅल्फीन’ या कथेत आपला देश सोडून परदेशी वास्तव्य कराव्या लागणार्या एका आजीबाईंची मानसिक आंदोलने टिपली आहेत. उतार वयात आयुष्याला वेगळे वळण लावून घेणे, नवीन जीवन पद्धती स्विकारणे, त्याच वेळेला भूतकाळातील आठवणी, अशा सर्व संमीश्र भावनातही कुठेतरी एकटेपण जाणवत असते. उसळ्या मारणार्या मनाला डाॅल्फीनची दिलेली उपमा अगदी सार्थ वाटते.

‘ बोच’ या कथेत एकत्र कुटुंब पद्धती चे उत्तम चित्रण पहावयाला मिळते. एकाच कुटुंबातील व्यक्तिंचे वेगवेगळे मानवी स्वभाव अनुभवायला मिळतात. वाचकाने जर एकत्र कुटुंब पद्धती अनुभवली असेल तर अशा घटना थोड्याफार फरकाने आपल्याही कुटुंबात घडल्या होत्या याची खात्री पटेल.

‘ तो ‘ मधला विहंग हा चुकीच्या वाटेने जाणार्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. वय आणि मनाचा असमंजसपणा यामुळे आयुष्य भरकटत जाऊ शकते. कथेत शेवटपर्यंत उत्सुकता वाटते.  पण शेवट

असमाधानकारक  वाटतो. विहंगच्या आयुष्याला कोणती दिशा मिळाली हे सांगियला हवे होते असे वाटते.

‘सा  रे’ या कथेत एकत्र कुटुंबातील उपेक्षित महिलेचे जिणे दाखवले आहे. अशा स्त्री ची मानसिक अवस्था काय असेल याचे चित्रण केले आहे.

‘पप्पांचं वाक्य’ म्हणजे ‘ अखंड सावधान असावे ‘ या उक्तीची आठवण करून देणारी कथा.  सरळमार्गी माणसाला या व्यवहारी जगात जगणं किती अवघड आहे हे दाखवून देणारी कथा.

निवृत्तीनंतर बदललेली जीवनपद्धती, एकाकीपणाची भावना, बदल म्हणून केलेला दूरचा प्रवास, पण तिथेही जोडीदार बरोबर असूनही वाटणारं एकाकीपण, आपण दुर्लक्षित गेलो आहोत ही भावना आणि शेवटी दूर होणारा गैरसमज अशी भावनांच्या गुंत्यात अडकलेल्या तिची कथा म्हणजे ‘दोन ओळी’.

कडक शिस्तीच्या आजोबांचे व्यक्तिचित्रण करणारी कथा म्हणजे ‘ हरवले ते ‘. असे आजोबा किंवा अन्य कोणी ना कोणी मोठ्या कुटुंबात असतातच. फणसासारखं व्यक्तिमत्व. पण आपले व्यक्तिमत्व घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ही आजोबांची आठवण म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त केली आहे.

एखाद्या व्यक्ती प्रमाणे एखाद्या वस्तू वर, गावावर, ठिकाणावरही प्रेम बसू शकते. विरह झाला तरी आठवणी मनातून जात नाहीत. मनात जपून ठेवलेल्या  आपल्या जुन्या घराच्या स्मृती  अंतर्बोल बनून बाहेर पडल्या की ‘ वास-निवास’ सारख्या कथा जन्म घेतात.

फक्त आपल्याच नव्हे तर दुसर्याच्या स्वप्नभंगाचे  दुःखही वेदनादायी कसे ठरते हे दाखवून देणारी कथा म्हणजे ‘ स्वप्न’. या स्वप्नभंगाला अजाणतेपणे का असेना आपण जबाबदार असलो तर मन लागणारी बोच आयुष्यभर आपल्याला माफ करत नाही.

लेखिकेने स्वतः बॅंकेत नोकरी केली असल्यामुळे बॅंकेचे कार्यालयीन अंतरंग लेखिकेला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे ‘शस्त्र’ या कथेत रंगवलेले प्रसंग, प्रतिक्रिया, वातावरण हे अगदी वस्तुस्थितीला धरूनच आहे. एक बॅंक कर्मचारी म्हणून मला या कथेचा आस्वाद घेताना फारच मनोरंजन झाले.

‘ इनबाॅक्स’ या कथेत  नवीन पिढीला समजेल अशा भाषेत समजून सांगणारी आई  ही जास्त कौतुकास्पद वाटते. अर्धवट वयातील मुलाला  समजून घेऊन तिने प्रश्न अगदी सोपा करून टाकला आहे. मनाच्या इनबाॅक्स मध्ये अनुभवांचे आणि विचारांचे मेल येतच राहणार. पण कोणत्याच व्हायरसला बळी पडायच नाही, असं सागणारी ही कथा तरूण पिढीलाही नक्कीच आवडेल.

तर अशा या विषयांच्या विविधतेने नटलेल्या तेरा कथा. गप्पा मारता मारता सहजपणे सांगाव्यात इतक्या साधेपणाने सांगितलेल्या गोष्टी. बोजड शब्दांचे अवडंबर न माजवता साध्यातून सुंदर कथानक आणि आशय देणार्या या कथा लवकरच लेखिकेला चौथ्याकडून पाचव्या संग्रहाकडे घेऊन जावोत हीच सदिच्छा  !.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments