जीवनरंग
☆ सापळा…भाग 1 ☆ श्री आनंदहरी ☆
त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.. ही बातमी साऱ्या मिलमध्ये वाऱ्यासारखी पसरली.. ‘ त्यानं कोणता गुन्हा केला ? पोलिसांनी कशासाठी ताब्यात घेतलंय ? याची कुणालाच काही माहिती नव्हती..
“तरी मी म्हणतच होतो.. तो काही वाटतो तितका सरळ नाही.. खाल मुंडी आणि पाताळ धुंडी आहे?”
“आस्सं ss ? कवा म्हणलावता तुमी आसं ? अवो, जवा बगंल तवा त्येच्या मागं-म्होरं असायचासा की..आरतीची थाळी घिऊन..”
“अरे, माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या मागं- पुढं राहावं लागतं.. जाऊ दे तुला नाही कळायचं ते..”
“व्हय, आमास्नी काय कळतंया.. पर येक सांगा.. त्यो आला असता मुंबैस्नं तरीबी तुमी आसंच म्हणला आस्तासा का ?”
“मग भितो का काय कुणाला ? तोंडावर म्हणायला कमी नाही करणार.. खरं ते खरंच.”
“काय पण म्हणा राव.. पोरगं हुशार आणि कामसू.. असं काय करंल आसं वाटलं न्हवतं..”
“अहो, चेहऱ्यावर का लिहिलेलं असतं असे करील आणि असे नाही म्हणून ? अहो, ‘ हर चेहरे पे नकाब हैं !’ म्हणतात ते काही खोटं नाही बघा.”
“पण नेमकं झालंय तरी काय ? एवढं पोलिसांनी पकडण्यासारखं ?”
“…आणि ते ही मुंबईत ? पण पोलिसांना मात्र मानलं पाहिजे.. गुन्हेगार अगदी पाताळात लपून राहिला तरी सोडत नाहीत त्याला.’
“अवो, पर त्यो लपलावता कवा ? त्यो तर मिलचं काम घिऊन गेलाय न्हवं ? “
“व्हय.. काम घिऊन गेलाया.. ततं गेल्याव भुलला आसंल मुंबैला.. गेला आसंल जीवाची मुंबै कराय.. आन घावला आसंल पोलिसांस्नी..”
“आरं पर त्ये पोरगं तसलं न्हाय वाटत.. उगा काय बी बोलू नगासा..”
अशा नाना प्रकारच्या चर्चा, कुजबुज. कुठं दबक्या आवाजात तर कुठं खुलेपणाने. मिलमधील साऱ्या कामगारांच्यात चालली होती. नेमकं काय झालंय आणि काय नाही हे खरंतर कुणालाच माहीत नव्हतं … पोलिसांनी त्याला पकडलंय एवढीच बातमी कर्णोपकर्णी होऊन जवळजवळ प्रत्येकापर्यंत पोहोचली होती.. आणि ती पोहोचताना प्रत्येकाने नेहमीच्या सवयीने आपापल्या अंदाजाची, आखाड्याची भर त्यात घातली होतीच.. पण नेमकं काय घडलंय ते मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं.
पोलिसांनी त्याला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नुसतंच बसवून ठेवलं होतं.. ते तिघंही काहीसे घाबरलेले होते.. आपण काय केलंय ? का म्हणून आपल्याला असे इथं आणून बसवून ठेवलंय ? हे त्यांना काही कळत नव्हतं. ’ एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही..’ असे पोलिसाने दरडवल्याने ते तिघंही मुक्या, हलत्या बाहुल्यांसारखे एकमेकांशी काहीही न बोलता खाली मान घालून बसले होते. सकाळपासून त्यांच्या पोटात चहाचा घोटसुद्धा गेला नव्हता पण मनावरच्या प्रचंड ताणामुळे आणि भीतीमुळे त्यांना अजूनतरी त्याची जाणीव झाली नव्हती. त्याचे दोन्ही सहकारी घाबरून रडवेल्या चेहऱ्याने बसले होते पण तो मात्र खाली मान घालून कसल्यातरी विचारात गढून गेला होता.
खरंतर, त्याला पुढं खूप शिकायचं होतं. एस.एस.सी.ला म्हणजे त्यावेळच्या अकरावीला त्याला चांगले साठ टक्के मार्क पडले होते.. आताच्या काळात साठ टक्के मार्क्स म्हणजे काहीच वाटत नसले तरी त्याकाळी साठ टक्के मिळवणारे दोन-चार विद्यार्थीच असायचे शाळेत.. आणि केंद्रात तर ती संख्या दोन आकड्यातली असायची. तो त्यात होता. त्याकाळी साठ टक्के मार्क मिळणे हे अभिमानास्पद असायचे. ‘ मुलगा खूप हुशार आहे.. फर्स्ट क्लासचा आहे ‘ असे मानलं आणि म्हणलं जायचं.
एस.एस.सी.ला चांगले मार्क्स पडले याचा त्याला खूप आनंद झाला होता. तो आनंदानं घरी आला. वडील गोठयात बैलांना पाणी दाखवत होते.. आई घरात चुलीवर चहाचं आदण ठेवत होती.. ‘ पोरगं शाळेत गेलंय, आज त्याचं पास-नापास आहे ’ हे त्या दोघांनाही माहीत होतं. पोरगं हायस्कुलात शिकतंय याचा त्याच्या आई-बापाला कोण अभिमान. तसं म्हणलं तर त्या दोघांनीही शाळेचं तोंडसुदधा बघितलेलं नव्हतं पण पोरगं शिकतंय आणि दरसाल पास होतंय म्हणल्यावर त्यांनी त्याला फारसं काम न लावता शिकू दिलेलं होतं.
पोराला ‘पास- नापास’ घेऊन घरात आलेलं पाहिलं तसं दोन्ही बैलांना पाणी दावून बाबा लगोलग घरात आले होते तर आईनं पोरगं उन्हातनं आलंय म्हणल्यावर चुलीपुढनं उठून पाण्याचा तांब्या दिला होता.
हातपाय धुवून आत आल्यावर त्यानं दिवळीत ठेवलेलं निकालपत्र बाबांच्या हातात दिलं.बाबांनी ते उलटं पालटं करून पाहिलं आणि त्याला विचाऱलं,
“पास झालास न्हवं ?”
“हो.”
“लई ब्येस झालं.. बरं का गं, रातच्याला कायतरी ग्वाडध्वाड कर.. आपला तान्या म्याट्रिक पास झालाया.”
त्याच्या वडिलांनी तिथूनच आईला जेवणात काहीतरी गोडधोड करायला सांगितलं. आई आतून चहा घेऊन बाहेर आली. तिनं त्याला आणि बाबांना चहा दिला..
क्रमशः……
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈