श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ देह झिजतो ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
योजना योजून कोणी खेळ बदले गोमटे
जिंकताना देह झिजतो निघत जाते सालटे
जंगलाच्या भव्यतेची ज्यास सत्ता लाभली
बांधले तेथेच त्याने शांत त्याचे खोपटे
लावणारा लावतोना भोगण्याला सावली
अंगणाच्या कोपऱ्याला वाढणारे रोपटे
पुण्य सारे साठवाया थोर केली साधना
चोरण्या साठीच आले आस-याला भामटे
राजमार्गी चालण्याची ज्यास मिळते पावती
रोखण्याला धाव त्याची लाल होती बावटे
का विरोधी लोकशाही मांडताना भांडती
लावती मागे जगाच्या खूप त्यानी झेंगटे
घेतले खावून ज्यांनी तेच झाले बावळे
ताप देती रोज आता भाजलेले पावटे
माणसाने माणसाचा तोडला विश्र्वास का
तेरडा होवून तो ही रंग त्याचा पालटे
(देवप्रिया/कालगंगा)
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈