कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
स्व शांताबाई शेळके
कवितेचा उत्सव
☆ आज वाटते पुन्हा बघावी ☆ स्व शांताबाई शेळके ☆
(
आज वाटते पुन्हा बघावी
सळसळणारी हिरवी शेते
आणि पडावी कानावरती
झुळझुळणारी निर्झरगीते
कडेकपारी घुमवित यावा
रानांतिल पवनाचा नाद
आणि तयाने मनिंच्या निद्रित
मृदूभावांना द्यावी साद
मोहरलेल्या आंब्याखाली
शीतळशा छायेत निजावे
उग्रमधुर गंधाचे आसव
सर्वांगानी पिउनी घ्यावे.
आकाशाचा गूढ नीलिमा
अर्धोन्मीलित नयनी देखत
घटकेमागून घटिका जावी
स्वप्नांच्या मधुमाला रेखित
हृदयामधल्या निर्माल्याची
फिरूनी व्हावी सुमने ताजी
मनभृंगाने स्वैर तयावर
भिरभिरता घालावी रूंजी
हाय परी ते स्थान लाडके
आज दिसावे पुनरपि कैसे!
फिरूनी कसे आणावे सान्निध
स्वप्नदर्शि यौवनही तैसे?
चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia
स्व. शांताबाई शेळके
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈