सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ वादळवारं सुटलं गं… ☆ सौ  ज्योती विलास जोशी

चीनच्या वुहानहून निघालेल्या ‘करोना’ नावाच्या वादळानं आपल्या सर्वांच्या मानसिकतेवर आघात केला. पाठोपाठ अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या ‘तौक्ते’ नावाच्या वादळानं आपली नैसर्गिक संपत्ती जमीनदोस्त केली. आपल्या मातृभूमीचं प्रवेशद्वार घायाळ झालं तसं आपलं मन ही…..

या वादळाचं रौद्र रूप पाहताना, अनुभवताना,आपल्या मनाची किनार उध्वस्त झाली.सागराच्या छातीवर दिमाखानं झुलणारी गलबतं, त्याच्याच पोटात बुडून गेली. कित्येक दर्याचे राजे काळाच्या पडद्याआड गेले.राण्यांना वैधव्य आले.अश्रू परवानगीशिवाय डोळ्यातून सांडू लागले.

समस्त दर्यावर्दीना नेमेची भेटीला येणारं वादळ परिचयाचं असं.. सागराच्या भरती-ओहोटीचा खेळ सुख-दुःखाच्या लाटांगत अंगावर झेलत जीवन जगणारी ही माणसं. जीवनाच्या बोटीवर आनंदाचं शीड फडकवणारी ही जमात… हा विचार मनांत येताच ‘वादळ वारं सुटलं गं, वार्‍यानं तुफान उठलं गं.. या ओळींचं स्मरण झालं. शब्दप्रभू शांता शेळके यांनी लिहिलेल्या या गीतानं वादळाकडं सकारात्मक हेतूनं पाहण्याचा दृष्टिकोन मला मिळाला.

‘प्रतिभा’ हा शब्द थिटा पडावा अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई म्हणजे अनेकविध काव्य प्रकारांची एकाच काव्यशेल्यात गुंफण करणाऱ्या मनस्वी कवयित्री! त्यांची तीन कोळीगीतं म्हणजे बिल्वदलंच जणू! प्रत्येक गीत आनंदाच्या लाटा अंगावर घेत मस्तीत झुलावं अशा अवीट गोडीची….

कथाप्रवण आणि भावप्रवाही असणारी अशी ही तीनही गीतं…..

***वादळ वारं सुटलं गं……

प्रत्येक वेळी समुद्रात जाळं टाकताना जीवाची पर्वा न करणारा निधड्या छातीचा हा ‘दर्याचा राजा’आणि तितकीच निडर अशी ‘कोळीवाऱ्याची राणी’.समुद्राच्या रोजच्या वर्तनाबद्दल अनभिज्ञ असणारी ती, नेहमीच लाटांना आव्हान देत आनंदात गाते.तिचा तिच्या नाखवा यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच हे शक्य आहे. वारं,वादळ, तुफान,दर्याला येणारी भरती,पावसाचा कहर या सगळ्यांचं आव्हान ती स्वीकारते, नारळी पौर्णिमेला दर्याची पूजा करून आपल्या नाखव्यासाठी साकडं घालते, आणि आत्मविश्‍वासानं जगते.

एरवी नाखव्याला भेटीचा निरोप ज्या ढगांकरवी ती देत असते तेच ढग आज बेईमान झाले आहेत. वादळ, वार आणि तुफान या त्रिकुटाची तीव्रता ढगांच्या गडगडल्याने जास्त गंभीर होते आणि नकळत राणीच्या हृदयाची धडधड वाढते. शांताबाईंनी ह्या तिच्या धडधडीला ‘जणू शिडाची फडफड’ असं म्हटलं आहे.

नाखवा कामावर गेल्यावर रोजंच ती एकटी असते.पण तो एकांत असतो. आजचं आहे ते जीवघेणं एकटेपण… त्यामुळे माडांची सळसळ आणि खोपीतलं एकटेपण यामुळं तिचा डोळा लागत नाहीये.स्वप्नभंग होतोय की काय?अशी शंकेची पाल तिच्या मनांत चुकचुकतेय. तिची मानसिकता रंगवणाऱ्या शांताबाईंनी आपल्या काव्य प्रतिभेने येथे सर्वांना मंत्रमुग्ध केलय.

तुफान वारा सुटल्यावर आपल्या डोलकराला साद घालणारी आर्त, अगदी मनाला भिडणारी… हा हा हा रे……म्हणत गानकोकिळेतनं ती अचूक साधली आहे. प्रीतीचा जल्लोष असलेलं हे गीत, केवळ अप्रतिम!!

पाण्याला जसं उधाण येत चाललं तसं गाण्यातला वादळाचा वेगही वाढू लागला.ऋजू स्वभावाच्या शांताबाईंनी राणीच्या तोंडी एक सकारात्मक चारोळी देऊन वातावरण आनंदमयी करून टाकलंय. ‘सरसर चालली होडीची ताल’ म्हणत दर्याची राणी तिच्याच तालात नाचू लागते. नाखवा, त्याची बोट, फेसाळणारं पाणी यांना पाहून ती खूश होते. चांदणस्पर्शानं चमचमत्या झालेल्या मासोळ्या अर्थातच ‘दर्याचं धन’ गोळा करणाऱ्या तिच्या नाखव्याला ती ‘दर्याचा राजा’ म्हणते आणि स्वतःला दर्याची राणी म्हणवण्यात धन्यता मानते. मासळीबाजारात हा ताजा म्हवरा विकायला घेऊन जाताना ती सुखावते……

** राजा सारंगा माझ्या सारंगा….

वरील गाण्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं हे गीत…. वाऱ्यानं पाण्यात अलगद लाटा उसळाव्यात तसं हळुवार असं! या गीतातील दर्याची राणी वातावरणाची थोडी अनामिक भीती घेऊन जगते आहे. ‘सारंगा’ म्हणजे तिच्या नाखव्याची बोट…. तिला ती स्वतःचा धाकला दीर संबोधते त्याला ती ‘माझ्या डोलकराला अलगद घेऊन चल घरी’ अशी विनंती करते.वातावरणाचा अंदाज नाखवालाही आहे, तरीदेखील ती पुन्हा पुन्हा त्याची जाणीव करून देते. शेवटी अगतिक होऊन तिचे डोळे पाण्याने डबडबतात. शांताबाईंनी तिच्या डोळ्यातील अश्रुंना ‘पाण्याचा पूर’म्हणून विषयाचं गांभीर्य आणखी गडद केलंय…. संबाल संसार सारा… या ओळीतून तिची कळकळ जाणवते.

** डोलकर डोलकर दर्याचा राजा..

पराकोटीची वेगळी जातकुळी असलेला वेलवेट व्हॉइस (मखमली आवाज) असणाऱे हेमंत कुमार आणि लतादीदी यांचं हे द्वंद्वगीत….. बिल्वदलातलं हे तिसरं पान….कोळी भाषेतील शब्दांची साखरपेरणी करत शांताबाईंनी लिहिलेलं हे गीत, कोळीवाड्याचा माहोल डोळ्यासमोर उभं करतं. आपसूकच मन कोळी नृत्य करू लागतं……

लता मंगेशकर यांचं कौतुक ते काय करावं आम्ही पामरांनी? ‘या गो दरियाचा दरियाचा दरारा मोठा……..हे ऐकताना मोठा हा शब्द अवाढव्य होतो. ‘उठतया डोंगर लाटा लाटा लाटा…………..हे ऐकताना डोंगराएवढ्या लाटांची भीती वाटण्याऐवजी त्यावर बसून झुलाव असं वाटतं.

पंडित हृदयनाथ यांचं वादळी पण सुमधुर संगीत, प्रतिथयश गायकांचा आवाज आणि शांताताई यांची शब्दरचना असलेली ही कोळी गीतं ऐकताना मन कोळीवाड्यात भन्नाट फिरून येते…. पदन्यास घालतं….उधाण वारा पिऊन मन तृप्त होतं…

अशा या जीवनगाण्याच्या कवयित्रीला माझे शतशः नमन !

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments