कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
डाॅ.व्यंकटेश जंबगी
विविधा
☆ आठवणीतील शांताबाई शेळके… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆
साधारणपणे १९९२/९३ सालीची गोष्ट असावी! मी त्यावेळी तळेगाव दाभाडे (जि.पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी होतो. मला साहित्याची आवड शाळेपासून होती.कविता पाठ करायला आवडायचे.शांता शेळके यांच्या कविता आमच्या मराठीच्या पुस्तकात होत्या.तळेगावातील” चंद्रकिरण काव्य मंडळ” या साहित्य विषयक कार्य करणाऱ्या मंडळाचा मी त्या वेळी अध्यक्ष होतो.एकदा तेथील एका संस्थेने शांता शेळके यांना एका कार्यक्रमासाठी बोलावले होते.त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावले होते.मला अत्यंत आनंद झाला.मला १५ मि.बोलायचे असे सांगण्यात आले. ४ दिवस अवकाश होता.मी वाचनालयात गेलो व त्यांच्या निवडक कविता, भावगीते, चित्रपट गीते यांचा अभ्यास केला.भाषण शांताबाईंसमोर करायचे म्हणजे चांगली तयारी हवी.
कार्यक्रमाचा दिवस आला. शांताबाई वेळेवर आल्या. कार्यक्रमापूर्वी ओळख झाली. मी त्यांच्या पाया पडलो.
चहापाणी झाले. शांताबाईंबरोबर अनौपचारिक गप्पा झाल्या. माझे प्रस्ताविक भाषण झाले. त्यांचे भाषण ऐकताना आम्ही भारावून गेलो.आपली जुनी लोकगीते, त्यांची आवडती गाणी व कविता, प्रचंड वाचन आणि शब्दसंग्रह….सारेच अवाक् करणारे… त्यांनी “तारांबळ” हा शब्द कसा निर्माण झाला असावा ? हे फार मार्मिकपणे सांगितले. त्या म्हणाल्या,” लग्नामध्ये सगळ्यांची गडबड चालू असते, त्यावेळी भटजी ” तदेव लग्नं सुदिनं तदेव!” ताराबलं” दैवबलं तदेव….!!” असे म्हणत असतात. त्यावेळी ‘आमचं ताराबलं झालं’ (गडबड झाली)असं कोणीतरी म्हणाले असेल, त्यावरून हा शब्द रूढ झाला असावा”. ही एक आठवण..त्या म्हणाल्या,” पाच वर्षे वयाच्या मुलीलाही मी मैत्रीण समजते..मला तिच्याशी छान खेळता येतं. ” ही दुसरी आठवण.
मला भावला तो त्यांचा अत्यंत साधेपणा, ओघवती भाषा, गद्यातून पद्यात आणि पद्यातून गद्यात कधी, कशा जायच्या हे कळायचे नाही. त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या आयुष्यातील achievement..! त्यांच्या सर्व प्रकारच्या आणि सर्व काळातील साहित्याचा अभ्यास अचंबित करणारा आहे.
© डॉ. व्यंकटेश जंबगी
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈