कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ प्रतिभासंपन्न कवयित्री- शांताबाई शेळके ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

शांताबाई…. शांताबाई शेळके एक प्रतिभावंत कवयित्री.. लेखिका… संतसाहित्य, पारंपरिक गाणी.कविता यांचा एक चालता बोलता ज्ञानकोश असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अफाट वाचन करून मुखोदगत असणाऱ्या एक अभ्यासक, सच्चा रसिक.

शांताबाई चा जन्म पुण्याजवळील इंदापूर या गावी 12 ऑक्टोबर 1922 साली  झाला. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांनी शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत घेतले. त्यांच्या आईला वाचनाचे वेड असल्यामुळे शांताबाईंना लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली. आजोळी गेल्यावर पारंपारिक गाणी ओव्या त्यांच्या कानावर पडत त्यामुळे लहान वयातच कवितेची गोडी रुजत गेली. त्यांनी सर परशुरामभाऊ कॉलेजमधून बीए डिग्री संपादन केली. कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापक श्री. म. माटे, प्राध्यापक के. ना. वाटवे., प्राध्यापक रा. श्री. जोग यांच्यामुळे त्यांना अवांतर वाचनाची, कवितेची गोडी लागली. कॉलेजमधील नियतकालिकेत त्यांनी लेख लिहिला. त्याची प्रस्तावना माटे सरांनी लिहिल्यामुळे त्यांना लेखनासाठी हुरूप आला आणि त्यांच्या मनात कवितेची पाऊलवाट तयार झाली.बी.ए. झाल्यावर मुक्ता व इतर गोष्टी या नावाचा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. 1944 साली त्यांनी संस्कृत विषय घेऊन एम ए केले. या परीक्षेत त्यांनी तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी नवयुग साप्ताहिक मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. थोडे दिवस नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये व नंतर मुंबईच्या रुईया व महर्षी दयानंद कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून काम केले.

त्या निगर्वी, शांत व मितभाषी होत्या. ज्येष्ठ कलाकार म्हणून त्या कधीच  मिरवल्या नाहीत. आपण जे सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते इतरांनाही दिसावं अशी त्यांची भावना होती.या भावनेतून त्यांना “मधुसंचय”  पुस्तकाची कल्पना सुचली असावी.

“किलबिल किलबिल पक्षी बोलती” हे बालगीत लिहिताना या काव्यात’ कुणी न मोठे कुणी धाकटे’ ती ओळ फक्त त्यांनी लिहिलीच नाही तर त्या स्वतः आपल्या कृतीतून दाखवत.

देव, पूजा अर्चा यावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता पण’गणराज रंगी नाचतो किंवा गजानना श्री गणराया’ लिहिताना त्यां निस्सिम गणेश फक्त गेल्या.

‘ही चाल तुरू तुरू, उडती केस भुरुभुरु, लिहून प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली.

समुद्राची कल्पना करून,’ वादळ वार सुटल ग’ यासारखं गीत लिहिलं आणि ‘जाईन विचारत रानफुला’ लिहिताना विरहिणी झाल्या.

‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’या गीतातून वेगळा भाव वेगवेगळे तरंग आपणास दिसून येतात.

स्त्री मनाच्या भावनांचा वेध घेणारी अनेक गाणी त्यांनी लिहिली त्यापैकी काही गाणी स्त्री मनाची अवस्था व्यक्त करणारी आहेत उदाहरणार्थ’ तू न सखा मजसंगे वाटही उन्हाची’संगतीत एकाकी वेदना ही मनाची’

हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्यासंबंधी एक किस्सा वाचण्यात आला. लेखक रणजित देसाई व संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांना नाटकासाठी एक गाणं हवं होतं. शांताबाईंनी केलेले गाणे त्यांना पटेना तेव्हा तुम्हाला कसे गाणे हवे आहे? असे शांताबाईंनी विचारताच  त्यांनी एक शेर सांगितला. तो शेर शांताबाईंना भावला. त्यातून ‘काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुल ही रुतावे हा दैवयोग आहे’ हे अजरामर गीत जन्माला आले. तसेच पदराची किनार यासाठी शांताबाईंना शब्द सुचत नव्हता पण शेव खाताना’तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’ हे काव्य स्फुरले.

कविता कथा कादंबरी बालसाहित्य चित्रपट गीत समीक्षा आत्मकथन अनुवाद…. इत्यादी नानाविध साहित्यप्रकारात शांताबाईंनी लेखन केले पण त्यांचे खरे प्रेम कवितेवरच होते.

त्यांच्या प्रसिद्ध गीता पैकी काही गीते सांगता येतील “ऋतू हिरवा ऋतू बरवा, कळले तुला न काही, काटा रुते कुणाला, काय बाई सांगू, दिसते मजला सुख चित्र नवे, जय शारदे बागेश्वरी, शूर आम्ही सरदार, मराठी पाऊल पडते पुढे”. इत्यादी.

नादलयींचे नेमके भान, सुभग प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्य लेखनाचे वैशिष्टय होते. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिरांच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता त्यांच्या काव्यातून दिसून येते.

अशा या प्रतिभावान कवयित्रीने 1996 साली आळंदी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले तसेच 1996 साली त्यांना गदिमा लेखन पुरस्कार देण्यात आला. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश”या गीताला सूरसिंगार पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट चित्र गीत लेखन पुरस्कार (चित्रपट भुजंग ) आणि साहित्य योगदानासाठी 2001 साधी यशवंतराव चव्हाण पुरस्काराने  त्यांना सन्मानित केले गेले. आज शांताबाई आपल्यात नाहीत पण त्यांचे साहित्य वाचताना अजूनही त्या आपल्यात वावरतात असा भास होतो.

अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई शेळकेंचा सहा जून हा स्मृतिदिन. शांताबाईंना विनम्र प्रणाम!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments