कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ शांता शेळके आणि बालकविता ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
बालगीतं मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडतात. अडगुलं मडगुलं पासून सुरु होणारी ही बडबडगीतं बाळाचं आईबरोबरचं नातं दृढ करतात. बोलता येत नसलेल्या वयापासून आई – आजीची ही बडबडगीतं बाळाला शब्द ओळख करून देतात.
तरल भावगीतं, लावणी, चित्रपटगीतं अशा अनेक प्रकारच्या काव्य शैलीचा सुरेल नजराणा ज्यांनी रसिकांना दिला, त्या थोर कवयित्री शांताबाई शेळके यांनी बालकविता ही लिहिल्या आहेत. बालविश्वात बालिका होऊन शब्दांना गोड बाल बोलीत बांधून ठेवलं आहे.
‘मुंगीबाई मुंगीबाई काम करतेस फार
सदानकदा कामाचा डोईवर भार’
असं म्हणत सहजच ठेक्यात, काम करत राहण्याचं महत्त्व त्या पटवून देतात.
‘हे ग काय आई
थांब ना बाई’
या कवितेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातील संवाद मांडला आहे.त्यांच्या कविता ताल, सूर, लय, नाद यांच्याशी जवळीक निर्माण करतात.आकारानं लहान, साधी, सोपी रचना यामुळं त्या कविता मुलांना भावतात.सहज लक्षात राहतात.
‘किलबिल किलबिल पक्षी बोलती
पानोपानी फुले बहरती….’
या कवितेत किलबिल, पानोपानी, झुळझुळ, भिरभिर अशी शब्दांची पुनरावृत्ती करून लय, ताल, यांचा सुरेख संगम या गीतात झाला आहे. शब्दांचं बोट धरून त्या मुलांना स्वप्ननगरीत घेऊन जातात.अपेक्षांचं ओझं लादणारी, नियम पाळायला लावणारी, निरागस वयात रॅटरेस मध्ये सहभागी व्हायला लावणारी मोठी माणसं या स्वप्नातल्या गावात नाहीतच मुळी! खेळणारं, बागडणारं, अवखळ बालविश्व चित्र काढल्यासारखं डोळ्यासमोर उभं राहतं.शब्दातून चित्र उभं करणं, तेही बालकल्पनेतलं आणि बालरंगातलं! त्यांना सप्तरंगी शब्दकुंचला गवसला होता.
‘पाकोळी’ या कवितेत,
‘गोजीरवाणे करडू होऊन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होऊन
फुलाफुलांतून उडू?’
स्वैर विहार करताना रानपाखरांशी संवाद साधायला शिकवतात. ओल्या हिरवळीच्या मखमली स्पर्शाचा अनुभव देतात. मखमल, हिरवळ, निळसर अशा अक्षरांच्या आणि शब्दांच्या पुनरावृत्तीमुळं कवितेला गेयता येते तशीच ती कविता मुलांच्या तोंडी सहज बसते.
‘कमळफुलांची आणि कळ्यांची
सळसळ चाले निळ्या तळावर
झुळुक झुळझुळे वारा येता
फुले कळ्याही हलती भरभर.’
‘अक्षरगाणी अंकउजळणी’ या पुस्तकातून अक्षर ओळख करून देताना ‘ळ’ या अक्षराची ओळख किती लयबद्ध केली आहे. ‘ळ’ ची पुनरावृत्ती झाल्यामुळं ही चारोळी हसत खेळत लक्षात न राहिली तर नवल!
या अक्षर ओळखीतून निसर्ग, तसंच आपले रितीरिवाज, सण, खाद्य संस्कृती यांचीही ओळख त्यांनी करून दिली आहे.
‘ हळदीकुंकू चैत्रामधले
मखरामध्ये गौर सजते’
हे सांगताना मराठी भाषेचा गौरव करायला त्या विसरल्या नाहीत. ज्ञानदेवांना माऊली म्हणून नतमस्तक व्हायला मराठमोळ्या बालकांना त्यांनी सांगितलं. मराठी भाषेतील अक्षर ओळख करुन देताना ‘ अमृतातेही पैजा जिंके’ हे त्यांनी आठवणीनं सांगितलं. इथं त्यांच मराठी भाषेवरील प्रेम दिसून येतं. भाषेचा अभिमान दिसून येतो.
शांताबाईंच्या बालकविता मोठ्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जातात. आजोळच्या वाटेवरील दाढीवाल्या वडाला सूरपारंब्या खेळायला बोलावतात. पालक आणि मुलं यांना एकत्र राहण्याचा आनंद देऊ शकतील अशा आहेत. बालक पालक नातं सुदृढ करणाऱ्या आहेत. मुलांच्या कल्पना, भावनिक विकास, संवेदनशीलता यांची वाढ करणाऱ्या आहेत.
आजी – आजोबा, आई – बाबा आणि नातवंडं या तिन्ही पिढ्यांना एकत्र जोडणारा आनंदठेवा आहे.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
९६६५६६९१४८
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈