कवितेचा उत्सव
☆ कधीतरी☆ श्री ओंकार कुलकर्णी ☆
कधीतरी
मी होतो माझा कधीतरी
असलो स्वप्नात जरी
सूर साठवून देतो
साद शिणल्या मेंदूला
ऐकतो गाणे एकाकी
एकटाच असलो जरी
मी होतो माझा कधीतरी
असलो स्वप्नात जरी
रंग भरूनी घेतो
आसमंत डोळ्यामधी
चालते अशीच ही
एकटीच चित्रकारी
मी होतो माझा कधीतरी
असलो स्वप्नात जरी
प्राणवायू भरूनी घेतो
फुफ्फुसामध्ये नासिकेतूनी
लोम अनुलोमातूनी
रोम रोमात रोमांचकारी
मी होतो माझा कधीतरी
असलो स्वप्नात जरी
क्षणासाठी माझा असतो
चोचले जीवाचे पुरवूनी
जगतो जरा थोडासा
असलो सत्यात जरी
मी होतो माझा कधीतरी
असलो स्वप्नात जरी
© श्री ओंकार कुलकर्णी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈