सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ “स्वराज्य – सुराज्य” ☆ सौ. अमृता देशपांडे 

हिंदुस्थान- भारत  गेल्या अनेक शतकांपासून परकीय साम्राज्याच्या राजवटीखाली होता. आदिलशाही, निजामशाही, पातशाही, इंग्रज , अशा अनेक  राजवटींनी भारतावर राज्य केलं. भारतातील काही प्रदेशांवर  फ्रेंच, पोर्तुगीजांनी राज्य केलं. तेव्हा पासून या देशातल्या प्रजेवर, रयतेवर, आणि एकूणच सामान्य जनतेवर सक्ती, दडपशाही,  त्यांच्या धर्माची पायमल्ली,  स्त्रियांवर अत्याचार ह्याचे वर्णन इतिहासात आढळते.

 नंतर या पारतंत्र्याला, अत्याचाराला विरोध करणारी, जनतेच्या मनात स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग फुलवणारी,  ठिणगी पेटवणारी , परकीयांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी बलिदान देणारी अनेक अनेक थोर स्त्री पुरूष व्यक्तिमत्वे आपल्या देशात होऊन गेली. आपल्या इतिहासाचे प्रत्येक पान त्यांचे जीवन, आणि बलिदान ह्याची आपल्याला जाणीव करून देते.

जाणीव करून देते मानवता धर्माची, स्वराज्याची आणि  सुराज्याची.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारधारा स्वातंत्र्याबरोबर स्वराज्याची होती. सत्य,  अहिंसा,  स्वावलंबन,  आत्मनिर्भरता अशा मूलभूत तत्वांवर आधारित सुराज्याची होती.

गांधीजींनी स्त्रियांना सीतेसारखे चारित्र्य,  शील यांचा आदर्श घेण्याचा उपदेशच केला नाही तर त्यांच्यातल्या सीतेच्या अंशाची,  स्त्री शक्ती ची जाणीव करून दिली. जगातील प्रत्येक स्त्रीने  स्वतःतील स्त्री शक्तीला जागृत केले तर ती स्वतः, तिचा परिवार,  समाज आणि राष्ट्र या सर्वांचीच प्रगती झपाट्याने होऊ शकते ह्या विचारांचे बीज त्यांनी समाजात पेरले.

परकीयांची सत्ता उखडून टाकण्यासाठी,  मातृभूमीचे साखळदंड तोडण्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता यांचे आचरण आवश्यक आहे. हे त्यांनी निक्षून सांगितले व त्याचाच आग्रह धरला.

इंग्रज राजवटीला उलथून टाकण्याच्या लढ्यात अनेकांनी दिलेले बलिदान आज स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्षी ही तितकेच जिवंत आहे. 15 ऑगस्ट हा वार्षिक दिवस येतो तेव्हाच ही सर्व चरित्रे, प्रसंग,  घटना परत समोर येतात.  स्वातंत्र्य दिन अशा विभूतींच्या स्मरणार्थ ध्वजवंदन करून, राष्ट्रगीते गाऊन,  त्यावरचे चित्रपट प्रदर्शित करून साजरा केला जातो.

पण हे करत असताना प्रत्येक सूज्ञ भारतीयाच्या मनात सतत एक विचार डोकावत असला पाहिजे कि, 1857 पासून 1947 पर्यंत 90 वर्षे म्हणजे जवळ जवळ एक शतक आपल्या असंख्य पूर्वजांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढ्यात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली,  त्यांना  74 वर्षानंतर आजच्या दिवशी वंदन करण्यासाठी तरी आपण लायक आहोत का? पात्र आहोत का?

ज्या इंग्रजांना ‘ चले जाव ‘ म्हणून हाकलून लावले, त्यांचेच अनुकरण आपल्याला आदर्श वाटते. भारतीय संस्कृती,  भारतीय एकात्मता आणि भारतीय असल्याचा अभिमान  ह्या विचारांकडे आपण सोयिस्करपणे डोळेझाक करत आहोत.

‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार आत्मसात करताना आपल्या देशहिताकडे दुर्लक्ष होते आहे, ही जाणीव राज्यकर्त्यांनी,  समाजधुरीणांनी युवा पिढीला करून द्यावी,  ही अपेक्षा सर्व भारतीयांची आहे. सध्याच्या युवा पिढीच्या मनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने परत एकदा स्फुल्लिंग जागृत केले आहे,  ही आश्वासक,  समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

म्हणूनच प्रत्येक भारतीयाने

” राष्ट्र – प्रथम ” हा  शब्द मनात धरून जीवन विकास करणे अत्यावश्यक आहे.

देशातील प्रत्येक क्षेत्र शैक्षणिक,  औद्योगिक,  शेती, वित्त, बॅकिंग,  अनुशासन, सहकार, वैद्यकीय सेवा,  औषध उत्पादन, सेवा क्षेत्र,  विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology), संशोधन ( Research) , digital globalization अशा विविध  क्षेत्रात काम करताना ‘ राष्ट्र- प्रथम ‘ हाच मंत्र अनुसरला , कार्यपद्धतीत लागू केला तर नकळतच अनेक विकासात्मक गोष्टी साध्य होतील.

धर्म, जात, वर्ण, राखीवता  या गुंत्यातून बाहेर पडून मानवता , भारतीय एकात्मता आणि भारतीय संस्कृती ह्या त्रिसूत्रीवर आधारित असा ‘ पूर्ण विकसित ‘ देश साकारणे हेच आपले ध्येय ठेवू या.

शालेय वयात अभ्यासलेल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे महत्त्व,  राष्ट्रगीताचे महत्त्व पुढच्या प्रत्येक अभ्यासक्रमात सामील करणे अत्यावश्यक केले तर विस्मरण होणार नाही.  प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य सचोटीने निभावले तरच  हक्क मिळवण्याची अपेक्षा ठेवणं  रास्त आहे.

” वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् ” ही गदिमांनी दिलेली उक्ती जर आचरणात आणली तर राष्ट्राच्या विकासाबरोबर स्वतःची प्रगती ही अढळ असेल.

‘बलसागर भारत होवो

विश्वात शोभुनी राहो ‘

हे स्वप्न साकारणे आपल्याच हातात आहे.  त्यासाठी एकच लक्षात ठेवू या,

” देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा “.??????

 

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170  

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments