सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ अभिमान मजला तिरंग्याचा …… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

परवा टोकियो आॅलींपीक मधे मैदानावर सुवर्णपदक विजेत्या, पाठीवर अभिमानाने आपला तिरंगा मिरवत आलेल्या  नीरज चोप्राला बघितले आणि ऊर अभिमानाने, आनंदाने भरून आला…

खरं म्हणजे कधीही ऊंचावर, डौलाने फडकणारा भारताचा तिरंगी झेंडा पाहून ज्याचे मन ऊचंबळत नाही तो भारतीयच नाही…

अमेरिकेत असताना, एका इंडीअन स्टोअरवर फडकणारा तिरंगा पाहिल्यावर माझी नात चटकन् म्हणाली आज्जी look at the Indian flag.

त्या क्षणीच्या माझ्या भावना शब्दातीत आहेत. माझ्या अमेरिकन नातीच्या डोळ्यातली चमक पाहून मला जाणवले ते तिच्यातलं टिकून असलेलं भारतियत्व…

अशा आपल्या तिरंगी झेंड्याला निश्चीतच एक अभिमानास्पद इतिहास आहे. त्यांतील तीन रंगांनाही भरीव अर्थ आहे.

आज दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ध्वज पहायला मिळाले.

१९०६ सालचा पाहिला ध्वज, ज्यात लाल पिवळा हिरवा असे तिरंगी पट्टे होते आणि मधे वंदे मातरम् ही अक्षरे होती. लाल पट्ट्यावर चंद्र, सूर्य आणि हिरव्या पट्ट्यावर कमळे होती.

मादाम कामाने १९३६ साली आणलेल्या ध्वजावर हिरवा पिवळा केशरी असे पट्टे होते केशरी पट्ट्यावर चंद्र, सूर्य तर हिरव्या पट्यावर आठ तारे होते.मधल्या पट्यावर वंदे मातरम् अक्षरे होती.

होमरुल चळवळीच्या वेळी लो.टिळक आणि अॅनी बेझंट यांनी पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एकामागे एक ठेवले व त्यातआठ कमळांऐवजी सप्तर्षींप्रमाणे सात तारे होते..

आंध्र प्रदेशीय पिंगली व्यंकय्या याने हिंदु आणि मुसलमान या दोन धर्मांचे प्रतीक म्हणून लाल व हिरवा असे दोनच पट्टे ठेवले..मात्र गांधीजींनी पांढर्‍या रंगाचा पट्टा त्यात समाविष्ट केला आणि प्रगती चिन्ह म्हणून चरख्याचे चित्र टाकले…१९३१ साली काँग्रेसने या झेंड्यास मान्यता दिली. मात्र १९४७ साली चरख्याच्या ऐवजी अशोकस्तंभावर असलेले धर्मचक्र आले. केशरी पांढरा हिरवा आणि मधे चोवीस आर्‍यांचं धर्मचक्र असा हा तिरंगी ध्वज १५आॅगस्ट १९४७ साली दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ,स्वातंत्र्याची ग्वाही देत अभिमानाने फडकला.

पहिला केशरी रंग म्हणजे त्याग, बलीदान समर्पण यांचे प्रतीक.

पांढरा रंग म्हणजे मांगल्य, पावित्र्य, शुचीता शांतीचे प्रतीक.

हिरवा रंग म्हणजे सुजल, सफल समृद्धीचे प्रतीक मधले धर्मचक्र म्हणजे गती, प्रगतीचे चिन्ह..

भारताचा हा तिरंगा म्हणजे भारताची शान अभिमान.

त्याचा वापर कपडे, वेशभूषा, सांप्रदायिक कामासाठी होउ नये. तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. पाणी व जमिनीचा स्पर्श त्यास होऊ नये. हा ध्वज खादीचा, सुती अथवा रेशमी असावा.

सरकारी कार्यालये, घर कचेर्‍या यावर आरोहण, त्याचा मान आणि शान सांभाळून करावे. राष्ट्रध्वजापेक्षा ऊंच कुठलीही पताका नसावी. फक्त शहीद हुतात्म्यांच्याच शवाभोवती हा तिरंगा लपेटला जातो व त्यास मानवंदना दिली जाते…एखादी माननीय राजकीय व्यक्तीच्या निधनानंतर शासनाच्या परवानगीनेच तो अर्ध्यावर उतरवला जातो. हे सारे नियम घटनेत नमूद आहेत.

गेली ७४ वर्षे आपण अतिशय अभिमानाने जन गण मन या शब्दबद्ध सुरांच्या लयीत १५आॅगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण करुन, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्यांना स्मृतीवंदना आदरांजली अर्पण करतो… तेव्हां

झंडा उँचा रहे हमारा।विजयी विश्व तिरंगा प्यारा।।

हे गीत भारतीयांच्या अंत:प्रवाहात उसळत राहते…

आजकाल हा तिरंगा अंतर्देशीय खेळांच्या सामन्यात ,प्रेक्षकांकडून मिरवला जातो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याची प्रतीके रस्तोरस्ती विकली जातात.देशप्रेमाची एक झलक म्हणून स्तुत्य आहे परंतु नंतर या प्रतीकांचं काय होत.? दुसर्‍या दिवशी कचर्‍यात दिसतात…ही अवहेलना असह्य आहे .यावर शासनाने बंदी आणावी..

आमच्या लहानपणी शाळेत सफेद कपडे घालून भल्या सकाळी उठून ध्वजारोहणासाठी जाण्याची प्रचंड उत्सुकता असायची, त्याचबरोबर एक कर्तव्यबुद्धी असायची. पण आताच्या पीढीतली उदासीनता पाहून मन खंतावते. एका रक्तरंजीत, अभिमानाच्या इतिहासाशी आजचे युवक कसे कनेक्ट होतील हा विचार मनात येतो..

असो, मात्र हा प्यारा तिरंगा असाच विजयाने, शानदारपणे सदैव फडकत राहो आणि भारतीयत्वाची  आन बान शान राखो….!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments