सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदे,सिंधू, कावेरी जलेस्मीन संनिधिं कुरू।।
दररोज देवाची पूजा करीत असताना देवाजवळच्या तीर्थाच्या कलशात आपण सर्व नद्यांना आवाहन करतो. त्यांना त्या कलशामध्ये पाहतो. यावरूनच समजत, नद्यांना महत्व किती आहे ते. देशातील लहानमोठी प्रत्येक नदी आपली जीवनदायिनी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांनाही देवत्व दिलं आहे. त्यांना आपण माता, मैय्या, माई असंही म्हणतो. गंगा ही तर सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक, पौराणिक, भावनिकदृष्ट्या ही तिचं महत्त्व खूप आहे, की माणसाला शेवटच्या क्षणी गंगाजल तोंडात घालतात. पवित्र जल देशाच्या दक्षिणेपर्यंत पोचल तर, त्या तिर्था साठी, काशी हरिद्वारला जाण्याची गरज नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात तेही शक्य आहे. आणि त्यासाठी उपाय “नदी जोड प्रकल्प.”
भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक खंडप्राय देश आहे. येथील भिन्नभिन्न ठिकाणी हवा, पाणी, लोकसंख्या, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. देशाचा 35 टक्के भाग दुष्काळी, 33 टक्के भाग गंभीर दुष्काळ प्रवण आणि उत्तरेकडील भाग संपन्न असल्याचे दिसून येते. एकूणच विकासाचा सारासार विचार करता हे सगळं ‘पाणी’ या एका निकषावर अवलंबून आहे. व्यावहारिकदृष्ट्या देशातील जास्तीत जास्त भाग समपातळीवर, समान विकास यावा यासाठी सर्वोत्तम उपाय “नदी जोड प्रकल्प.”
भारताच्या लोकसंख्येत दर वर्षी 15 दशलक्ष संख्येने वाढ होते. अन्नधान्याची मागणी वाढते. पाण्याचे दुर्भिक्ष वाढते. भूजल पातळी खाली जाते. ऊर्जेची मागणी वाढते. दक्षिणेकडील राज्यात बऱ्याच भागात लहरी पावसामुळे पिके अपयशी होतात. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापन व ‘नदीजोड’ हा आश्वासक आणि खात्रीचा उपाय आहे .आणि ती या काळाची गरज आहे.
ऐतिहासिक विचार करता, एकोणिसाव्या शतकात इंग्रज इंजिनियर ऑर्थर कॉटन यांनी दक्षिण पूर्व भागातील दुष्काळ कमी व्हावा व तिकडून आयात निर्यात करण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. 1970च्या दशकात के एल राव यांनी “राष्ट्रीय जलग्रीड” प्रस्ताव मांडला. २०13 पर्यंत अनेक प्रस्ताव होऊनही सर्व थंडच राहिले. 1999 नंतर सुरेश प्रभुंनी त्याचा अभ्यास केला. आणि’ ‘नदी जोड’ विचारांचे पुनर्जीवन झाले.
“नदीजोड प्रकल्प” हा नागरी अभियांत्रिकी प्रकल्प आहे. पूरप्रवण क्षेत्रातील जास्तीचे पाणी जलाशयात साठवून, ते दुष्काळी भागातील नद्यांतून सोडावे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. देशातील 37 नद्या या ठिकाणी जोडणे, 3000 जलाशय आणि चौदाशे 90 किलोमीटर लांबीचे कालवे काढावे लागतील. त्यामुळे प्रचंड प्रमाणावरील जमीन ओलिताखाली येईल. मोठ्या प्रमाणावर (४०००मे.वँ.) इतकी वीज निर्मिती होईल. उत्तरेकडील पुराचे दुष्परिणाम सोडवून, दक्षिणेकडील पाणीटंचाई दूर होऊन, हरितक्रांती होईल. वनीकरण वाढेल. पर्यावरण संतुलन होईल. रोजगार वाढेल. स्वस्त असणारी जलवाहतूक वाढेल. सर्वत्र सुजलाम-सुफलाम होईल.
नदीजोड प्रकल्पचा विचार करता, त्याचे तीन भाग केले आहेत.
१) उत्तर हिमालयीन चौदा नद्यांचा जोड.
२) दक्षिण द्वीपकल्प नद्यांचा जोड.
३) इंट्रा-स्टेट सदतीस नद्यांचा जोड.
अशा आराखड्याचे व्यवस्थापन जलसंपदा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय जलविकास (N. W. D. A.). संस्थेद्वारे केले जात आहे.
क्रमशः …….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता.
मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈