प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ स्वातंत्र्यदिन… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

स्वातंत्र्य दोन प्रकारचे असते . १) शारिरीक २) मानसिक.

आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या मगरमिठीतून मायभू, आपली माती मुक्त झाली. १५० वर्षे आपण त्यांचे गुलाम होतो.

त्यांच्या तालावर नाचत होतो.. नाचणे भाग होते, त्याला पर्याय नव्हता. ते आपले मालक व आपण त्यांचे गुलाम होतो. त्यांची प्रत्येक आज्ञा आपल्याला इच्छा असो वा नसो पाळावी लागत होती. इतक्या वर्षात ते सारे आपल्या अंगवळणी पडले होते.

सवईचे झाले होते, आपल्या नसानसात , मनात मुरले होते.

ते देश सोडून.. ही भूमी सोडून गेले .. पण त्यांच्या काळात जी मनोभूमी, आमची तयार झाली होती .. तिचे काय..? ती इतक्या सहजा सहजी जाणार होती काय ..? नाही. ही मानसिक गुलामगिरी.. सवयी इतक्या सहजासहजी जात नसतात. ते गेल्या नंतर त्यांनी जी व्यवस्था किंवा घडी बसवली होती तिच चांगली होती.. त्यांचे राज्य चांगले होते असे म्हणणारे लोक खूप होते. कारण स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जादूची कांडी फिरावी तशी लगेच सुव्यवस्था निर्माण होईल अशी लोकांची अपेक्षा होती .. ते एवढ्या मोठ्या देशात लगेच कसे शक्य होते? दारिद्र्य, अज्ञान, जुन्या रूढी परंपरा हे आमचे मोठे शत्रू होते, अजूनही आहेत .. ते लगेच जाणे शक्य नव्हते.

शिवाय त्यांनी मुरवलेले मानसिक अंपगत्व होतेच .म्हणजे बघा .. भूमी स्वतंत्र झाली होती. पण आमची मानसिक गुलामगिरी तशीच होती नि आहे. देशाने आम्हाला आचार, विचार, लेखन स्वातंत्र्य दिले आहे तरी आम्ही त्या मानसिक अवस्थेतून पूर्ण बाहेर पडलो आहोत का? आमची अवस्था आजही “.. ना .. घरका ना.. घाटका “अशी आहे. एकच उदा. इंग्रजी भाषा. इंग्रजी काय किंवा इतर कोणत्याही भाषा… जास्त भाषा बोलता आल्या तर उत्तमच. पण आपली मातृभाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा असते ह्या विषयी कुणाचे ही दुमत असू नये.इंग्रजी एक भाषा म्हणून शिकायला हवीच पण .. इतर देश पहा .. आपलीच मातृभाषा वापरतात.

आपल्याला मात्र इतक्या वर्षांनंतरही नक्की काय करावे सुचत नाही .. टिळक, गांधी काय इंग्रजी माध्यामात शिकले होते? हेच ते मानसिक अंपगत्व आहे. त्यांचे सूट, बूट, टाय..

अहो, अतिशय थंड प्रदेशातून ते आले होते. आम्ही भर उन्हाळ्यात लग्नकार्यात सूट घालून घामाघूम होत मिरवतो हेच ते मानसिक अपंगत्व .. आजकाल आम्हाला जमिनीवर बसताच येत नाही .. सवयी घेतल्या .. गुलाम झालो. म्हणून स्वातंत्र्य मिळाले तरी आम्ही अजून स्वतंत्र झालो आहोत का?

ह्याचा प्रत्येक भारतीयाने विचार करणे गरजेचे आहे.

या विषयावर खूप काही बोलता व लिहिता येईल पण तरी माझ्या मतांशी सहमत व्हावेच याची गरज नाही.कदाचित माझे लिखाण विषयाला सोडून झाले असे वाटल्यास ते मुक्त चिंतन समजावे ही विनंती …

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments