श्री प्रमोद वामन वर्तक

 

?? विविधा ??

⭐ रं ग ! ⭐  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“रंग ओला आहे !”

असं स्वतःचा रंग कोरडाठाक असलेली पाटी, कुठल्या तरी भिंतीवर, दुसऱ्या कुणीतरी तिला लावलेला गळफास घेत,  मूकपणे ओरडून ज्या वस्तूकडे अंगुलीदर्शन करत असते, त्या वस्तूला, तिथून येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्के लोकं बोटं लावून, खोटं ठरवायचा का प्रयत्न करतात, हा एक संशोधनाचा विषय नक्कीच होईल ! हुश्श !!!!

वरील पल्लेदार (का रंगतदार ?) वाक्य मराठीत असलं तरी, आपण त्याचा अर्थ नीट कळण्यासाठी परत एकदा वाचावं, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे ! आणि आपण जर वरील वाक्य एका दमात वाचलं असेल तर, आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असण्याची शक्यता आहे ! म्हणजे आता मजा बघा कशी आहे, एखाद्याची चोरी पकडल्यावरच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, असंच काही नाही ! या माझ्या विधानाशी आपण अ-सहमत होऊन उगाच रंगाचा बेरंग करणार नाही, असं मी माझ्या चेहऱ्यावरचा रंग न उडवता म्हणतोय !  आता, तो खरंच उडालाय का नाही याची सत्यता, असत्यता आपणास करायची असेल तर (स्व खर्चाने) सध्या मी रहात असलेल्या सिंगापूरी येऊनच करावी लागेल, त्याला माझा नाईलाज आहे ! आता सिंगापूरचा विषय निघालाच आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो, जसे आपण आपल्या बंगलोरला (का बेंगलूरू ?) “गार्डन सिटी” म्हणतो, तसंच इथले लोकं सिंगापूरला “सिटी ईन द गार्डन” असं अभिमानाने म्हणतात ! या सार्थ नावांतच, किती अर्थ आणि हिरवाई भरलेली आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे !

सांगायचा मुद्दा काय, तर रंगांच आकर्षण, सांनां पासून थोरां पर्यंत सगळ्यांनाच असतं.  ढोबळ मानाने जगनमान्य असलेल्या सप्त रंगांपैकी, या नां त्या कारणाने प्रत्येकाचा एखादा रंग जास्त आवडता, जवळचा असतो किंवा फार फार तर त्याच्या खालोखाल आवडणारा दुसरा एखादा रंग पण असू शकतो !

दर वर्ष सहा महिन्यांनी (स्वतःच्या) बायको बरोबर  साडी खरेदीला जाण्याचा योग, माझी रंगांची चॉईस चांगली असल्यामुळे येतो ! असंच एकदा शहाड्यांच्या का आठवल्यांच्या दुकानात, नक्की आठवत नाही, साडी खरेदीला गेलो असतांना (माझ्या सारख्या रिटायर्ड माणसाच्या बायकोच्या साडी खरेदीची उडी, याच दुकानाशी संपते !  “रूप संगम” “पानेरी” “पल्लरी” वगैरे डिझायनर साड्या विकणाऱ्या दुकानात आम्ही बाहेरूनच विंडो शॉपिंग करण्यात धन्यता मानतो !) सौ ने तिथल्या सेल्समनकडे “लहरी रंगाच्या साडया आहेत का ?” अशी विचारणा केली. तिचा तो प्रश्न ऐकून माझ्या चेहऱ्यावरचा रंग थोडासा उडाला, पण त्या सेल्समनने स्वतःच्या चेहऱ्याचा रंग न बदलता अगदी हसत हसत “आहेत ना, कालच नवीन स्टॉक आलाय !” अशी लोणकढी मारून आमच्या समोर त्या लहरी रंगांच्या साड्यांचा ढीग ठेवला, आता बोला ! त्या सेल्समनचे ते वागणे बघून माझ्या चेहऱ्याचा रंग आणखी उतरला ! कारण त्या वेळे पर्यंत लोकांच्या फक्त लहरी स्वभावाच्या रंग दर्शनाचा अनुभवच फक्त माझ्या गाठीला होता ! असो !

एखादा रंग दुसऱ्यावर खुलून दिसतो म्हणून, आपल्या रंग रूपाचा विचार न करता, त्याच रंगाचा शर्ट किंवा साडी नेसून स्वतःच हस करून घेण्यात काय हशील ! पण म्हणतात ना, पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना, हेच खरं ! आणि किती झालं तरी आपले दुसरे कुठले अंगभूत रंग उधळून, लोकांना त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या आवडीचे रंग परिधान करणे, हे केव्हाही सगळ्यांच्या दृष्टीने श्रेयस्करच, नाही का ?

सामान्यपणे सात रंगात जरी जगातल्या रंगांची वर्गवारी झाली असली, तरी काही नव नवीन रंगांचा शोध स्वतःला रंगारी म्हणवणारे लोकं, नित्य नेमाने लावत असतात ! हे रंगारी एवढ्यावरच न थांबता,  त्याला स्वतःच्या बुद्धिमत्ते प्रमाणे नांव देवून (का ठेवून?) मोकळे पण होतात ! जसं, आपल्या स्वतःच्या उपवर मुलीचे स्थळ सुचवतांना, मुलीचे आई वडील, तिचे वर्णन “नाकी डोळी निट्स, रंग – निमगोरा किंवा गव्हाळ किंवा सावळी” असा करतात. आता निमगोरा किंवा गव्हाळ असे रंग (ऑफिशियली) अस्तित्वात आहेत का नाही, हे मला खरंच ठाऊक नाही ! पण या दोन रंगांची उत्पती त्यांच्या नावासकट अशाच कुठल्या तरी उपवर मुलीच्या मातेकडून किंवा पित्याकडून फार वर्षां पूर्वीच झाली असण्याची दाट शक्यता आहे ! आता आपल्या सारखी चाणाक्ष माणसं, अशा तऱ्हेच्या रंगांच्या वर्णनातली मेख बरोब्बर ओळखतात, हे मी काय वेगळे सांगायला का हवे !

काही काही रंगांचा वापर हा साऱ्या दुनियेत ठराविक कारणासाठीच केला जातो, हे आपल्याला ठाऊक आहेच !

उदाहरणार्थ, लाल रंग धोक्याची सूचना देण्यासाठी किंवा हिरवा रंग धोका (तात्पुरता) नाही आहे हे कळण्यासाठी ! तसंच पांढरा रंग हा शरणगताचा मानला जातो ! काळा रंग काही जणांचा आवडता असला, तरी सर्व सामान्यपणे तो अशुभ मानतात ! हे रंगांचे ठोकताळे कोणा रंगाऱ्याच्या डोक्यातून आले, हा सुद्धा दुसरा  संशोधनाचा विषय होऊ शकतो !

पूर्वी माझ्या पिढीत, प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी मंडळी नेहमी गुलाबी रंगाचा वापर करीत असत ! पण हल्ली या गुलाबी रंगाची जागा, लाल रंगाच्या गुलाबाने सुद्धा घेतल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेने ताडले आहे !  बहुदा सांप्रतकाळी, अशा प्रेमात पुढे मिळणाऱ्या/होणाऱ्या धोक्याची जाणीव आधीच झाल्यामुळे, हा रंग बदल झाला असावा, अशी मी माझ्या मनाची सध्या तरी समजूत करून घेतली आहे  ! आजकाल प्रेमाच्या रंगात आकंठ रंगलेली प्रेमी मंडळीच ही माझी समजूत खरी का खोटी, यावर जास्त प्रकाश टाकू शकतील !

रोजच्या आयुष्यात वेग वेगळ्या रंगांचे किती महत्व आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही ! पण आपल्या रोजच्या जीवनातील एक साध उदाहरण द्यायच झालं तर, पूर्वी असलेला कृष्ण धवल दूरदर्शन संच आता कधीच कालबाह्य होऊन त्याची जागा, रंगीत दूरदर्शन संचाने नुसतीच घेतली नाही, तर त्याने आपल्या मनाचा पण पूर्ण ताबा घेवून, इथे ठाण मांडल्याचे आपण सध्या अनुभवत आहोतच ! फक्त त्याच्या आकारमांनात (खिशाला परवडण्याच्या प्रमाणात, आपल्या हॉलची साईज लक्षात न घेता ) बदल झाला आहे इतकंच !

“रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा” असं, या गीताचा आधार घेवून कोणी म्हणत असेल तर म्हणू दे ! त्यांना त्यांचा रंग लखलाभ ! पण आपण मला विचाराल, तर साऱ्या दुनियेचा रंगारी, जो हातात अदृश्य कुंचला घेवून वर बसला आहे त्याला आपण कदापि विसरून चालणार नाही ! त्याच्या मनांत येते तेव्हाच तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याला हवे तेच रंग, नित्यानेमाने भरत असतो आणि काढून घेत असतो ! एखादा रंग आपल्याला जास्त आवडतो म्हणून त्याने तो सतत आपल्याला द्यावा, असं आपल्या मनांत कितीही असलं  तरी, तो रंग कधी आणि किती  द्यायचा हे त्याचा तो अदृश्य कुंचलाच ठरवतो ! आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की आपल्या हातात फक्त आपल्या घराचा रंग जुना झाल्यावर तो बदलायचा, एव्हढेच असते ! आणि त्या वरच्या रंगाऱ्याने त्याच्या मर्जी नुसार आपल्या आयुष्यात बहाल केलेल्या रंगातच कायम समाधान मानायचं असते !

शेवटी, फक्त प्रार्थना करणेच माझ्या हातात असल्यामुळे, आपल्या सगळ्यांवरच, आपापल्या आवडणाऱ्या रंगांची कायम उधळण कर, हीच माझी त्या वरच्या रंगाऱ्याला हात जोडून विनंती !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१५-०८-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments