श्री उदय गोपीनाथ पोवळे
अल्पपरिचय
वय : ६० वर्षे
धंदा : यश ज्वेलर्स (गोल्ड ज्वेलरी शॉप), ठाणे
आवड : मॅरेथॉन रनर
जीवनरंग
☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
नाव : मुन्नी
संपूर्ण नाव : माहित नाही
वय : सात वर्षे
शिक्षण : १ ते १० आकडे लिहिता येतात
पत्ता : तीन हात नाका, पुलाच्या खाली, ठाणे
मुन्नी गेले चार दिवस रोज सकाळपासून खूप काम करत होती. त्याला कारणही तसेच होते. तीन दिवसांनी तिच्या आयुष्यात दर वर्षांनी येणारा एक मोठा दिवस होता. दिवस कसला तिच्यासाठी तो मोठा सण होता.
१५ ऑगस्ट. दरवर्षी १५ ऑगस्टच्या आधी एक आठवडा तिची मोठी बहीण मारू झेंडा प्रिंट केलेले कागद, बांबूच्या काड्या आणि काही रंगीत कागद आणायची आणि दोघी त्याचे झेंडे बनवायच्या . गेले तीन दिवस दोघींचे तेच काम चालू होते. बांबूच्या काड्यांना एका ठराविक साइजमध्ये कापून त्या पॉलिश पेपरने घासून त्यांना रंगीत चमकता कागद चिकटवून शेवटी छापिल झेंड्याचा कागद लावायचा. त्यांनी बनविलेले झेंडे खूपच आकर्षक दिसायचे. मारूच्या मार्गदर्शनाखाली मुन्नी ते काम शिकली होती. गेले दोन वर्षे त्या असे झेंडे बनवत होत्या , आणि ते हातोहात विकलेही जात होते. त्यामुळे मारू आणि मुन्नीला ह्यावर्षीही खूप हुरूप आला होता ते झेंडे बनवायला.
चार वर्षांपासून मुन्नी आणि मारू तीन हात नाका पुलाच्या खाली रहात आहेत. मुन्नीच्या जन्माच्या वेळी त्यांची आई वारली. नंतरची तीन वर्षे गावाला त्यांच्या बापाने त्यांचा कसाबसा सांभाळ केला आणि नंतर एका बाईच्या नादी लागून ह्या दोघीना वाऱ्यावर सोडून तो ते गाव सोडून गेला. मारू आणि मुन्नीमध्ये पाच वर्षाचे अंतर होते. ८ वर्षाच्या मारूला तेंव्हा काय करावे ते कळत नव्हते पण त्या छोट्या गावात, गावाच्या बाहेर असलेल्या झोपडीत राहणे सुरक्षित नाही, एवढे मात्र कळले आणि दोघी ते गाव सोडून कोण काही खायला देईल ते खात एका रेल्वे स्टेशनला आल्या. आलेल्या गाडीत मारूने मुन्नीसहित प्रवेश केला आणि थेट एका मोठ्या स्टेशनांत त्या दोघी उतरल्या. त्या स्टेशनचे नाव होते ठाणे.
त्याच दिवशी त्यांना एक भला माणूस भेटला. साठी पार केलेला फुगे विकणारा अबूचाचा. अबूचाचा हा भला मराठी माणूस. पण त्याच्या वाढलेल्या दाढीमुळे त्याला सगळे चाचा बोलत आणि त्यामुळेच त्याचा सगळ्यांना जरा वचकही होता. त्याच अबूचाचाने ह्या दोघींना खायला घालून त्यांना झोपायला एक चादर देऊन, त्यांची सोय तो रहात होता त्या तीन हात पुलाच्या खाली केली होती. तिथल्या सगळ्यांना अबूचाचाने ह्या माझ्याच मुली आहेत अशी ओळख करून दिल्याने कोणाचीही वाकडी नजर ह्या दोघींवर कधी पडली नाही. गेल्याच वर्षी एका गर्दुल्ल्याने मुन्नीची काही खोड काढून तिचा हात पकडला, म्हणून आबुचाचाने रागाने त्याला त्याचा हात तुटेपर्यंत मारला. पण त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून नेले, आणि तो अबूचाचा आजपर्यंत काही परत आलेला नाही. अबूचाचा गेल्यानंतर मारूने स्वतः जवळ एक चांगला चाकू ठेवायला सुरवात केली आणि आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्यांना तो दाखवला– आणि तेंव्हापासून त्या दोघीही सुरक्षितपणे तेथे रहात आहेत.
ह्याच वर्षापासून सिग्नल शाळा चालू झाल्याने मुन्नीला जरा अक्षरांची आणि आकड्यांची ओळख व्हायला सुरवात झाली आहे. सिग्नल शाळेमुळेच त्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे मार्गदर्शन केले जात होते. रोजच्या रोज होलसेल मार्केट मधून काहीना काही वस्तू आणून त्या संपेपर्यंत सिग्नलवर विकायच्या, आणि रोजच काहीना काही खाऊन, वर चार पैसे जमवायचे हे अबूचाचाने त्यांना शिकविले होते. सुरवातीला काही खेळणी आणून विकायला सुरवात केली. पण नंतर लोकांना आवडतील अशा काही खास वस्तू मारू आणून देत असे आणि ते विकायचे काम मुन्नी करायची. त्याच धर्तीवर गेले दोन वर्षे झेंडे बनवून १५ ऑगस्टच्या आदल्या दिवशीपासून ते विकतांना मुन्नी तीन हात नाक्याच्या सिग्नलवर दिसत असे.
पूर्वी ह्या झेंड्याचे महत्व मुन्नीला माहित नव्हते. पण सिग्नल शाळेच्या शिकवणीमुळे, आपला देश, आपला तिरंगा झेंडा, आपल्या झेंड्याला आपले सैनिक कसे मान देतात, ह्या सगळ्या गोष्टी तिला कळायला लागल्या. ते झेंडे आपण बनवून, सगळ्यांना विकून त्यांच्या गाडीत, घरी पाठवतो ह्याचे तिला एक वेगळेच आकर्षण वाटत होते. आपण झेंडे बनवून ते विकतो ह्याचा तिला अभिमान वाटत होता आणि त्यामुळेच गेले चार दिवस ती खूप मेहनत घेऊन झेंडे बनवायचे काम करत होती.
१४ ऑगस्टला मुन्नीने सकाळी लवकर उठून आंघोळ करून झेंडे विकायला सुरवात केली. दरवर्षी त्यांच्या आकर्षक रंगीत कागद लावलेल्या झेंड्याना चांगला प्रतिसाद असायचा, तसाच सुरवातीला तो मुन्नीला मिळाला. सुरवातीच्या दोन तासात तिचे तसे चांगले झेंडे विकले गेले. पण नंतर सिग्नलवर तीन अनोळखी मुले आली आणि त्यांनी प्लास्टिकचे झेंडे विकायला सुरवात केली– तेही मुन्नी विकत होती त्यापेक्षा कमी पैशांमध्ये. त्या झेंड्यांपुढे मुन्नीचे झेंडे फिके दिसत होते आणि त्यामुळे लोक मुन्नीचे झेंडे खरेदी न करता ते प्लास्टिकचे झेंडे विकत घेत होते. दुपारपर्यंत मुन्नी झेंडे घेऊन फिरत होती, पण तिचे झेंडे काही कोणी खरेदी करत नसल्याने ती हिरमुसली. ज्या उत्साहाने तिने झेंडे विकायला सुरवात केली होती तो तिचा उत्साह निवळला—-
क्रमशः……
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈