विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग १ ☆
15 ऑगस्ट !!! ही नुसती तारीख नव्हे, आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता… आणि एकेवर्षी मी सुद्धा ! भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच !
सुरुवातीला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो. महिन्याचं उत्पन्न … 4-5 लाख !
पण यांतही समाधानी नव्हतो ! —-भरपूर पैसे कमावणे, वर …वर… वर जाणे …आणखी वरचे पद मिळवणे—–घर गाडी बंगला घेणे—-आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे—– जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे—-जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !–फरक इतकाच, तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी… गाढवावर !—–
हे गाढवही मीच होतो आणि गाढवावर बसलेला दीडशहाणाही मीच !
एके दिवशी, आयुष्याच्या वाटेत भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी दीडशहाण्या सिकंदराची नशा उतरवली—-!—-माणूस म्हणून जगण्याचं सूत्र सांगितलं—-!
ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती या पॕथी वापरणं, हे माणूस असल्याचं लक्षण असतं—- हे त्यांनी माझ्यावर ठसवलं—-!
वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण—हे त्यांनीच मनावर बिंबवलं !
डोंगरावर चढणार्या माणसाचे पाय ओढून त्याला पाडण्यापेक्षा, जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो—-पुरुषार्थाची ही व्याख्या त्यांनी मला नव्यानं सांगितली—!
ते खरंतर भिक्षेकरी नव्हते, ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधून मधुर रस चावून चावून ओरबाडून घेऊन, उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !
बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात उतरल्या होत्या… पण मनात नाही… !
मी धावत होतो शर्यतीत—!शर्यतीची नशा होती —!!
पैसे… पद… प्रतिष्ठा … मी एकेक गड जिंकत चाललो होतो… पण मन भरत नव्हतं !
हे सगळं कमावून झाल्यावर, एके दिवशी भेटायला गेलो त्यांना… आणि समजलं, की मला मुलगा समजणारे “ते” बाबा बेवारस म्हणून रस्त्यावर “मेले”——!
हो–मेले —स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं, आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी …!
——“मेला” हा शब्द प्रतिष्ठा नसणाऱ्यांसाठीच ठेवणीत ठेवलाय !
ते मरुन गेले… आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले—–!
मी त्यांचा मुलगा म्हणून जिवंत असूनही ते बेवारस म्हणून गेले—-!
मी अंतर्मुख झालो !——
ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्या लोकांत आणि माझ्यात फरक काय ?
पूर्वी ऐकलेले त्यांचे विचार आता कानातून मनात उतरायला लागले—- Heart पासून हृदयात यायला लागले… !
त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत—- ! —
आणि या दीड शहाण्या सिकंदराची नशा पूर्ण उतरली !
जग जिंकण्यापेक्षा, जगातला “माणूस” जिंकावा, किंवा माणुसकीचं “जग” जिंकावं…!
—उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं !
आणि, हा दीड शहाणा सिकंदर त्या गाढवावरून उतरला, आणि 14 ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला.
आणि—- 15 ऑगस्ट 2015 ला “ भिकाऱ्यांचा डॉक्टर “ म्हणून तो रस्त्यावर आला… !
स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला… !
मीच स्वतः स्वीकारलेल्या ‘पद-पैसा-प्रतिष्ठा ‘ या शर्यतीतून मी स्वतंत्र झालो तो दिवस होता
15 आॕगस्ट 2015 —— म्हणुन हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन… !
—–या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असूनही “दीन” होते—- 15 आॕगस्ट 2015 नंतर ते पैसा नसुनही “दिन” झाले !
जवळचे लोक म्हणतात… हरलास तू आभ्या !—-
नाही! अजिबात नाही —–
शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं … ? हे कळणं जास्त महत्वाचं !
योग्य ठिकाणी हरावंच लागतं… !
कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो !—-
कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही… की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही.
एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघूनही आपल्याला आनंद झाला तर समजावं—-आपण आत्ता खरे “मोठे” झालो—-बाकी वय बीय सारं झुठ !!!
वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं—–जेव्हा ते मन शुभ्र करेल—तेव्हा त्याची किंमत—-!
नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतू आकडा !!
क्रमशः…..
© डॉ. अभिजित सोनवणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈