विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆
दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.
15 ऑगस्ट 2015 ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता, अंगावरची झूल काढली होती. मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी !
आज बरोबर या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली, म्हणून साधारण सहा वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे——
वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली व्हायची, म्हणून भीक मागणा-या समूहासाठी मी काम करायचं ठरवलं.
ते तर गेले… पण त्यांच्यासारखे अजून खूप आहेत—त्यांतल्या एखाद्याला हात देवू, या विचारांतुन—-!
या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून मग मी रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.
सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती. मी भीक मागणाऱ्यांमध्ये मिसळायचा प्रयत्न करु लागलो.
सुरूवातीला लाज वाटायची…! डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.
मुखवटा लावला होता… !
पण मला भीक मागणा-या लोकांनी त्यांच्यात सुरुवातीला येवू दिलं नाही. त्यांना वाटायचं, हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन … ! (कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं )
किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा …!– डाॕक्टर आहे हा xxx—गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल, रक्त विकेल, अजून काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल— यांत आपण मरुन जाऊ—-या डॉक्टरचा भरवसा काय ?
किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल, फसवुन “धंद्याला” लावेल. (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो— शरीर विक्रय करणा-या या ताईंमध्ये माझी उठबस होती. काही लोकांना वाटायचं, हा माझा “धंदा” आहे, आणि मी मधला दलाल ! भीक मागणाऱ्या समुहामध्ये हाच गैरसमज पसरला होता)—-
या सर्व गैरसमजापोटी, या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातली, धमक्या दिल्या, शिव्याही दिल्या. खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले, काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे…! मी त्यांच्यात येवुच नये, यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे !
मी पूर्णपणे निराश झालो होतो. या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं…
मी पूर्णपणे निराश झालो !
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली. कुत्रं तरी बरं, त्याला कुणीतरी हाड् म्हणत का होईना, तुकडा तरी टाकतं… मला ते ही मिळेना !
एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणून नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते– नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो… !
या काळात भिक्षेक-यांपेक्षा वाईट अवस्था झाली माझी ! मी खरोखरचा बेरोजगार, बेनाम झालो होतो…
14 आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेऊन आदरानं भेटायला यायचे —–
15 आॕगस्ट नंतर भिक्षेकरी पण मला हाकलून द्यायचे… माझ्यावर थुंकायचे !
किती विरोधाभास !
लाखोंचा पगार थांबल्यामुळे, माझं घर डबघाईला आलं—- कालचा साहेब, आज भिकारी झाला !
एका रात्रीत रावाचा रंक होतो… आणि रंकाचा रावही होवू शकतो… ही म्हण मला माहीत होती… !
मी रावाचा रंक झालो होतो. त्या काळात, एका भिका-याचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं … !
—अशा परिस्थितीत, डॉक्टर मनीषा धावून आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तिनं निभावलं !
तिने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला…
—आई-वडील डॉक्टर पी. डी. सोनवणे आणि सौ भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला.
—माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला…!
—-पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो… ! आर्थिक आणि मानसिक !
त्यातही मी रस्त्यांवर फिरायचो — भिक्षेक-यांत….
आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे—-
“ काय हो, महाराष्ट्र प्रमुख, आज रस्त्यावर कसे काय तुम्ही…?” खी.खी.. खी… हसत लोक टोमणा मारायचे… !
“ एसी हाफीसात बसणारे तुमी… आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा … आरारारा…. वाईट वाटतं बुवा तुमचं… खी..खी… खी…! “
“काय वो सर… आज भिका-यांत बसले तुम्ही…? काय पाळी आली राव तुमच्यावर… खी..खी… खी…!”
“ कशाचा सर रे तो …? खी..खी… खी…”
——ही खी… खी… खी… मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!
मात्र या खी… खी… खी…ने माझे इरादे अजू न मजबूत केले !
क्रमशः…..
© डॉ. अभिजित सोनवणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈