सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ खिडकी(कविता) – सुश्री समिधा गांधी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अगं!!
ती खिडकी उघडून
केव्हा पाहिले होतेस
तुझ्या मालकीच्या
आकाशाच्या तुकड्याकडे?
तिथेच तर असणार आहे
कुठे हरवणार का आहे
असा विचार करून
त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस
अधूनमधून खिडकी उघडत जा
आकाशाला नीट न्याहाळत रहा
नसतील दिसत इंद्रधनूचे सप्तरंग
नसेलही कदाचित नक्षत्रांची रांगोळी
दिसेल झाकोळलेले नभ
कधी असेल कडक ऊन
दिसणार नाही मुक्त उडणाऱ्या
पक्षांची लांबचलांब माला
तरीही खिडकी उघडायचे
कधीही थांबवू नको
ती मिळविण्यासाठी केलेला
आटापिटा तू विसरू नको
तरच कदाचित तू तुझ्या
लेकीसुनांना त्यांच्या वाटचा
आभाळाचा तुकडा, नाही नाही
संपूर्ण आकाश मिळवून देशील
सुश्री समिधा गांधी
संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈