डॉ अभिजीत सोनवणे
विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ४ ☆
—आज सहा वर्षानंतर माझं भिक्षेक-यांचं कुटुंब 1100 इतक्या लोकांचं आहे. यात मला 200 ते 300 इतके आईबाप आहेत, तितकेच आजी-आजोबा आहेत आणि या वयामध्ये मला आणि मनिषाला 200 ते 300 पोरं सुद्धा आहेत !
—–आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं !
या सर्वांशी मानसिक नाती जुळवता जुळवता 1100 भिक्षेक-यांना वैद्यकीय सुविधा देत आहोत.
यांच्या, म्हणजेच आमच्या 52 पोराबाळांचे शिक्षण करत आहोत, याहून आनंद कोणता ?
डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या भिक्षेकरी आजीआजोबांचे रस्त्यांत अपघात होतात, यात त्यांचे जीव जातात, हातपाय मोडतात…. ते टाळावे म्हणून अशा 950 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन आपण करून दिले आहेत आणि आता अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे.
रस्त्यावर बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या 22 आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे. ते तिथे माझे आई बाप – आजी आजोबा म्हणूनच राहतात. स्वतःचं नाव आणि आडनाव सुद्धा ते विसरून गेले आहेत…आता ते आडनाव सुद्धा “सोनवणे” म्हणुन लावतात ! ‘ सोनवणे ’आडनावाला याआधी इतका सन्मान कधी मिळाला नव्हता… !
पण, आईबापाला आधार दिला म्हणून स्वतःला सुदैवी समजू , की आईबापाला वृद्धाश्रमात ठेवावं लागतंय म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू—-?——-या विचारांत आजही झोप लागत नाही मला !
हा भीक मागणारा समूह जर कष्टकरी झाला, तरच समाज त्याला गावकरी म्हणून स्वीकारेल याची मला जाणीव झाली .—मग भीक मागणारांना गावकरी बनवायचं हे ध्येय ठरवून ” भिक्षेकरी ते कष्टकरी “, आणि “ कष्टकरी ते गावकरी ” ही आमच्या कामाची टॕगलाईन मी ठरवली !
——माझ्या शब्दांना भिक्षेकरी गटामध्ये थोडी किंमत आहे हे कळल्यानंतर, मी त्यांना भीक मागणं सोडायला प्रवृत्त केलं, आणि त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यास सुरुवात केली– याला यश येऊन 105 कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आहे , आणि ही कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.
रस्त्यावर चालणार्या या कामांमध्ये मला अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत झाली——
—-पब्लिक चॕरिटी कमिशनर आॕफिस, इन्कम टॅक्स ऑफिस, महिला व बालकल्याण, दिनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल, लेले हाॕस्पिटल, पोलीस डिपार्टमेंट, पुण्यातील नामांकित संस्था आणि व्यक्ती !
अशा संस्थांमधील बड्या अधिका-यांची नुसती भेट घेणंसुद्धा “मुश्कील ही नही नामुमकीन है” . —तरीही ही मंडळी मला लहान पोरगं समजून मला वेळ देतात— माझं ऐकून घेतात—मदत करतात. मोठ्ठ्या खुर्चीतली ही सर्व माणसं माझ्यासाठी मुद्दामहुन छोटी होतात ! लहान बाळाबरोबर खेळतांना आपणही लहान होतो तसंच…!!! —–कसे ऋण फेडावे यांचे ?
याच प्रवासात आपल्यासारखे सुहृद भेटले आणि आपण माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून संस्थेला देणगी देण्यासाठी सुरुवात केली.
मी सुद्धा या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी, करत असलेल्या कामाचा सर्व लेखा-जोखा दर महिन्याला सर्व सुहृदांना पाठवत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल सर्व बाबी प्रांजळपणे कळवतो, आणि सल्ला सुद्धा घेतो.
——-यातून कामांमध्ये एक पारदर्शीपणा राहण्यासाठी खूप मदत झाली. शिवाय हे काम फक्त डॉक्टरचं नाही तर आपलंही आहे हे समाजाला वाटायला लागलं !
न फेडता येणा-या आपल्या ऋणांत आहे मी,— माझा साष्टांग नमस्कार स्विकारावा !
हे सर्व करत असताना मी भीक मागणा-या व्यक्तींच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि यातूनच जन्म झाला माझ्या ब्लॉगचा… !
भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोहोचू लागले.
शाबासकी मिळू लागली आणि या अशा शाबासकी ने माझा हुरूप आणखी वाढला.
काही लोक माझे ब्लॉग स्वतःचे म्हणून त्यांच्या नावावर कॉपी करून पुढे पाठवतात. या गोष्टीचा मला मुळीच खेद नाही—–पण खेद याचा वाटतो की ते फक्त माझे ब्लॉग कॉपी करतात. माझं काम नाही… !
——ब्लॉग कॉपी करण्याबरोबरच, माझं काम जेव्हा ते कॉपी करतील तो दिवस माझ्या आनंदाचा !
क्रमशः …
© डॉ. अभिजित सोनवणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈