श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #75 ☆
☆ गा-हाणं…! ☆
वर्षभर आम्ही तुझ्या
येण्याची वाट पाहतो..
तू येतोस आणि आमचं घर
आनंदानें भरून जातं
खरं सांगायचं तर
आमची सारी स्वप्नं तुझ्या
येण्या न येण्यावरच अवलंबून असतात..!
मुलांच शिक्षणं
बायकोला नवं लुगडं
आईच्या औषधांचा खर्च
आणखी बरंच काही…
फक्त तुझ्यावरच अवलंबून असतं..!
हे माझ्या एकट्याचं नाही
तर असंख्य लोकांच
हेच मनोगत आहे
कित्येकांनी तर तुझ्या
न येण्यानं आपला जीवन प्रवास
अर्धवट सोडून..
अत्महत्ये सारखा अवघड मार्ग
स्विकारलाय..!
आताही..तुझ्या येण्यानं..
आम्हांला आनंद होतो पण..
त्या पेक्षा जास्त ..
तुझ्या येण्याची भिती वाटू लागलीय
कारण…
तू येशील आणि सगळीकडे
दु:खाचं सावट पसरवून जाशील..
अन् आम्ही..
काहीच करू शकणार नाही…!
तुझ्या अशा वागण्याचं
कारण काय
माहीत नाही पण ..
हे पावसा…,
आम्हा तमाम शेतक-याची
तुला एक विनंती आहे..
आमच्या शेतात
एक वेळ कमी धान्य पिकलं तरी चालेल..
आमची मुलं एखादी इयत्ता
कमी शिकली तरी चालतील
पण …
महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला
तू असं पाण्यात ठेऊ नकोस ..
हे पावसा दर वर्षी..
आम्हा शेतकऱ्यांच गा-हाणं तू ऐकतोस
तसंच
आम्हा शेतक-यांच हे ही गा-हाणं
तू ऐकशील ह्याची खात्री आहे..!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈